सोलापूर शहरासाठी पाच हजार कोटींची शहर नियोजन आराखडा केंद्र सरकारने मंजूर केला असून या योजनेत देशातील ६२ शहरांमध्ये सोलापूरचा समावेश राहणार असल्याचे पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले.
क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने होम मैदानावर आयोजिलेल्या तीन दिवसीय बांधकाम व बांधकाम साहित्य प्रदर्शनाचा समारोप झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुडेवार बोलत होते. या प्रसंगी महापौर अलका राठोड व जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह क्रेडाई सोलापूर शाखेचे अध्यक्ष सुनील फुरडे, प्रदीप पिंपरकर, प्रदर्शनाचे निमंत्रक शशिकांत जिद्दीमनी, राजेंद्र कांसवा-शहा, समीर गांधी आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शहर नियोजन आराखडय़ामुळे शहरवासीयांचे विकासाचे स्वप्न साकार होण्यास ख-या अर्थाने मदत होणार असल्याचे आयुक्त गुडेवार यांनी नमूद करताना हा नियोजन आराखडा पुढील ४० वर्षांतील शहराची वाटचाल तथा विस्तार विचारात घेऊन तयार करण्यात आला आहे. देशातील निवडक ६२ शहरांसाठी ही योजना केंद्राने मंजूर केली असून त्यात सोलापूरचा समावेश झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या महत्त्वाकांक्षी नियोजन आराखडा मंजूर होण्याचे श्रेय आयुक्तांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना दिले.
शहरातील बांधकामांविषयक क्रेडाईच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासन परवानगी व नियमावली यांच्यात सुसूत्रता राखण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्याचा मानसही गुडेवार यांनी बोलून दाखविला. शहरातील चौक, रस्ते, तसेच स्मशानभूमी यांच्या सुशोभीकरणासाठी क्रेडाईकडून नियोजन आराखडा तयार करून मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुण्याच्या धर्तीवर सोलापुरात इको हाउसिंग संकल्पना राबविली जाईल. यातून एक स्टार, दोन स्टार, पाच स्टार मिळणा-या इको घरांना त्या प्रमाणात सवलत देण्याची योजना असल्याचे गुडेवार यांनी सांगितले.

Story img Loader