मुंबई आयआयटीमध्ये सातत्याने नवे प्रयोग होत असतात. त्यात आणखी एका प्रयोगाची भर पडली आहे. संस्थेच्या शैक्षणिक इमारतीवर मंगळवारी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. हा प्रकल्प अन्य सौरऊर्जा प्रकल्पांपेक्षा तंत्रज्ञानाने अद्ययावत असून याद्वारे ऊर्जानिर्मितीचा वेग वाढणार आहे.
हा सौरऊर्जा प्रकल्प फोटोव्होल्टिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. विद्युत प्रवाह अधिक गतीने प्रवाहित होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आयआयटी मुंबईत ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर योजनें’तर्गत फोटोव्होल्टिक संशोधन आणि शिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आयआयटीमध्ये सर्वाधिक ऊर्जेचा वापर सकाच्या वेळात प्रयोगशाळांमध्ये होत असतो. हे लक्षात घेऊन या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला आहे, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी दिली. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या १ मेगावॉट ऊर्जेमागे आमचे वीजेचे बील ५ टक्के कमी होणार आहे. यामध्ये वीज बील कमी करणे हा उद्देश नसून हे तंत्रज्ञान मुलांना समजावे व या संशोधनात त्यांना अधिक रस निर्माण व्हावा हा उद्देश असल्याचेही खक्कर यांनी स्पष्ट केले.
या संस्थेने ऊर्जेच्या इतर पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली असून हे खरोखर कौतुकास्पद असल्याचे केंद्र सरकारच्या ‘न्यू अँड रिन्युएबल एनर्जी’ विभागाचे सचिव डॉ. सतीश अग्नीहोत्री यांनी सांगितले. येथे बसवण्यात आलेल्या प्रकल्पामुळे शैक्षणिक इमारतीला १५०० किलोवॉट कमाल विजेची क्षमता राखीव ठेवण्यात आलेली आहे. यातील १००० किलोवॉट वीज प्रत्यक्षात वापरली जाते. यातील २५ टक्के वीज या सौरऊर्जा प्रकल्पातून तयार होऊ शकते अशी माहिती ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी दिली.
फोटोव्होल्टिक तंत्रज्ञान
फोटोव्होल्टिक प्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेल्या सेमीकंडक्टरमुळे डायरेक्ट करंट (डीसी) वीज तयार होते. या तंत्रज्ञानात बसविण्यात आलेले सोलार पॅनेल १०० वर्षांहून अधिक काळ वापरले जाऊ शकतात, असा दावा केला जात आहे. सुरुवातीला पॅनल बसविण्यासाठी थोडा जास्त खर्च येतो. परंतु त्यांच्या कार्यक्षमतेच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. आयआयटीमध्ये बसवण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये १ मेगावॉट कमाल क्षमतेचे १६ युनिट बसविण्यात आले आहेत. यामधून सूर्यप्रकाशाच्या दर दिवसाच्या प्रखर अशा ५.३२ तासांमध्ये वीजनिर्मिती होते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये ४० टक्के ऊर्जा निर्मितीची क्षमता असते तर ही क्षमता या प्रकल्पामध्ये ७८ टक्कय़ांपर्यंत वाढते.

Story img Loader