महिला सक्षमीकरणाचे नवे धोरण राज्य सरकार लवकरच आणणार असून महिला स्वावलंबन, सुरक्षितता व शिक्षण यासाठी अनेक ठोस निर्णय त्यात घेतले जातील, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड यांनी येथे दिली.  
राहाता येथे आयोजित स्वयंसिद्धा यात्रा महोत्सव व महिला बचतगट उत्पादित मालाच्या तालुका प्रदर्शनाचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे होत्या. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे आदी यावेळी उपस्थित होते.  गायकवाड म्हणाल्या, शालिनीताई विखे यांनी तीन वर्षांपूर्वी साईज्योती जिल्हा प्रदर्शन भरवून बटतगटांच्या महिलांना स्वयंसिद्धा बनण्याची संधी दिली. हजारो महिला त्यामुळे स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. आता त्यांनी तालुकास्तरावर प्रदर्शन भरवून महिलांना पुन्हा मोठे दालन उपलब्ध करून दिले. श्रीमती विखे म्हणाल्या, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या प्रेरणेतून आपण ही चळवळ सुरू केली. महिलांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी या चळवळीतून मिळत आहे. शासनाने यासाठी निधी वाढवण्याबरोबरच ग्रामीण महिलांच्या प्रश्नांचा विचार करण्याची मागणी केली. मंत्री विखे, म्हस्के, दांगट, विवेक गुजर यांचीही भाषणे झाली. कैलास सदाफळ, कैलास कोते, सुमित्रा कोते, निवास त्रिभुवन, भाऊसाहेब कडू, सुभाष विखे आदी यावेळी उपस्थित होते.