प्रशिक्षक पायलट सोहेल अंसारीचा मृत्यू
गोंदियातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन ट्रेनिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट येथील एक विमान २४ डिसेंबरला दुपारी १२.४० वाजेपासून उड्डाण भरल्यानंतर निर्धारित वेळेपर्यंत दुपारी २.४० पर्यंत परत न आल्याने त्या बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध मंगळवारपासूनच युद्घपातळीवर सुरू होता. बुधवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास ते विमान मध्यप्रदेशातील पचमढी जिल्ह्य़ातील बेलाखाडी तामिया गावाजवळ आढळून आल्याची माहिती पचमढी पोलिसांनी गोंदियातील भारतीय विमान प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना कळवली.
या विमानाला बिरसी येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय अ‍ॅकॅडमी, रायबरेली येथील सोहेल अंसारी हा पायलट चालवत असताना हा अपघात घडला असून या दुर्घटनेत पायलट सोहेल अंसारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. हे विमान २४ डिसेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास बेलाखाडी जंगल झुडपात  कोसळले. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गोंदियातील बिरसी विमानतळात ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन ट्रेनिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट’ येथे गेल्या ४ वर्षांपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमी, रायबरेली येथील प्रशिक्षक पायलट तेथे या दिवसात हवामान खराब असल्यामुळे प्रशिक्षणासाठी बिरसी विमानतळावर येतात. यावर्षी प्रशिक्षण घेण्यासाठी २६ प्रशिक्षक पायलट १० विमाने घेऊन बिरसी विमानतळावर आले होते. २४ डिसेंबरला बिरसी विमानतळावरून इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमीचा प्रशिक्षक पायलट सोहेल अंसारी हा डीएस-४० या विमानाने दुपारी १२.४० ला बिरसी विमानतळावरून पचमढीसाठी रवान झाला, पण दुपारी २.४५ या परतीच्या निर्धारित वेळेपर्यंत हे विमान न आल्यामुळे बिरसी विमानतळ प्रशासनात खळबळ उडाली.
विमानाचा शेवटचा संपर्क दुपारी १.४५ वाजता नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झाला होता. दरम्यान, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमीचे कॅप्टन जे.पी. शर्मा यांनी याबाबतची माहिती भारतीय विमान प्राधिकरणचे प्रमुख रायविजय यांना दिली व बिरसीजवळील रावणवाडी पोलीस ठाण्यातही याबाबतची माहिती देऊन नागपूर, रायबरेली, जबलपूर येथील विमान प्राधिकरणाला गोंदिया-बिरसीतून बेपत्ता झालेल्या एअरक्राफ्ट विमान व प्रशिक्षक पायलटबद्दल माहिती देऊन विमानाचे शोधकार्य २४ डिसेंबरला सायंकाळपासून सुरू केले. बुधवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास बिरसी विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना मध्यप्रदेशातील पचमढी पोलिसांनी बेलाखाडीजवळील तामिया -मटकुली जंगलात हे बेपत्ता विमान अपघातग्रस्त झाल्याचे व प्रशिक्षक पायलट सोहेल अंसारी याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच बिरसी विमानतळावरील सोहेलच्या सहकारी मित्रात हळहळ व्यक्त केली जात होती. नंतर बिरसी विमानतळातील कॅप्टन जे.पी. शर्मा व संबंधित विभागाचे अधिकारी पचमढी जिल्ह्य़ातील घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती आहे

Story img Loader