भाजपच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाचा वाद गणराज्य दिनापूर्वी म्हणजेच २६ जानेवारीपूर्वी सुटणार असल्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना दिली तरी अद्यापही हा तिढा सुटलेला नसल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांची रविवार,२७ जानेवारीला भेट घेऊन आपापली बाजू मांडली. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे या दोन्ही पदाच्या निवडणुका खोळंबून आहेत. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका अनेक ठिकाणी पार पडल्या तरी यवतमाळ जिल्ह्य़ात जिल्हा व शहराध्यक्षपदाची निवडणूक खोळंबलेली आहे.
माजी आमदार मदन येरावार यांचा एक गट, तर राजू डांगे यांचा दुसरा गट आणि प्रत्येक गटात उपगट, असे जिल्ह्य़ात चित्र असल्याने निवडणुकांना खीळ बसली आहे. येरावार गटाने उमरखेडचे माजी आमदार उत्तम इंगळे यांचे नाव पुढे केले आहे. पोलीस शिपायाची नोकरी सोडून थेट राजकारणात उतरलेल्या उत्तम इंगळे यांनी १९९५ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर आमदारकी मिळवली होती.
नंतरच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यांच्या खांद्यावर आता जिल्ह्य़ाची जबाबदारी टाकण्याचा निर्णय माजी आमदार मदन येरावार यांनी घेतला असला तरी खुद्द उत्तम इंगळे यांना मात्र मोठय़ा प्रमाणात विरोधही आहे व ते स्वत ही जबाबदारी पेलण्यास तयार नसल्याचेही समजते. येरावार विरोधी गटाने राजू डांगे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी सुचविले असून त्यांच्या कार्यकर्त्यांची एक चमू नागपुरात नितीन गडकरी यांना भेटली होती. या चमूने मुंबईतही प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे आदी नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असतांना या सर्व घडामोडी झाल्या होत्या, मात्र अचानक एका रात्रीत नितीन गडकरींना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून उतरावे लागून त्यांची जागा राजनाथसिंग यांनी घेतली. त्यामुळे या नव्या उलाढालीत जिल्ह्य़ातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना आता प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचाच आधार वाटत आहे.
यवतमाळात तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांपेक्षा चित्र एकदम बदलले आहे. कारण, काँगेस आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत उमेदवार उभा करण्यापासून तर निवडणूक लढण्याची आणि ती जिंकण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी सक्षम नेतृत्वाकडे जिल्ह्य़ाची धुरा सोपविण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यावर येऊन पडली आहे. ही जबाबदारी त्यांनी लवकरात लवकर पार पाडावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून ती   त्यांनी   बोलून दाखवली आहे.
२७ जानेवारीला एका कार्यक्रमात हजर राहण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यवतमाळात आले असतांना जिल्ह्य़ातील भाजपच्या विविध गटांनी त्यांची वेगवेगळी भेट घेऊन परिस्थिती विशद केली आहे. आता मुनगंटीवार यांच्या निर्णयाची कार्यकर्त्यांना आतुरतेने प्रतीक्षा आहे.