नागरिकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक तात्काळ व्हावी, अडचणी संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येण्याची वाट पाहू नये, या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आणि जिल्हा दक्षता समितीच्या सभेत त्यांनी आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी पी.एस. काळे, समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
भ्रष्टाचार निर्मूलनांतर्गत तीन अर्ज प्राप्त झाले होते. दोन अर्जावर चौकशी करण्यात आली. एका अर्जावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्य़ातील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू वेळेत मिळाव्यात. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात जुनी शिधापत्रिका देताना जे उत्पन्न घोषणापत्रात नमूद केले होते. त्यानुसार सध्या दाखले दिले जात आहेत. अशा याद्या ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत वाचन करावे, कोणा अपात्र व्यक्तीचे नांव यादीत येऊ नये, किंवा पात्र व्यक्तीचे नाव यादीतून वगळले जावू नये, महावितरणकडून पूर्वकल्पना न देता विद्युत मीटर तोडले जावू नये, वीज वितरणने सर्वाना समान वागणूक द्यावी. पेट्रोल पंपावर ग्राहकांची लुबाडणूक होऊ नये, राज्य मार्ग परिवहन विभागाने नरखेड येथील प्रवासी दराबाबत फेरतपासणी करावी, अप्रमाणित औषध विक्रेत्यावर कारवाई करावी, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.  
७६ तक्रारी दाखल    
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आज आयोजित लोकशाही दिनात विविध विभागाच्या ७६ तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. उबाळे इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader