‘इनमीन आठ महिन्यांचा कालावधी नाही झाला अजून तर लगेच झाला सुरू तुमचा कंठशोष. अरे, काम करायला काही वेळ देणार आहात की नाही?, निवडणुका लागल्याने तेव्हा गेलो अंमळ जास्त आश्वासने देऊन. पण, तोच धागा पकडून तुम्ही एकसारखे तुणतुणे वाजविणार असाल तर तुमच्यासमोर काही न बोललेले बरे..!’ 
मध्यंतरी काही कारणास्तव होऊ न शकलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा सोमवारी प्रत्यक्षात झाला खरा, परंतु, दौऱ्याचे मंगळवारचे स्वरूप काहिसे असेच राहिले. नाही म्हणायला, त्यांनी शहराचे प्रथम नागरिक आणि पालिका प्रशासनाच्या प्रमुखांशी बंद दाराआड चर्चा करून एकूणच शहर विकासाशी संबंधित प्रश्नांचा अवघ्या अर्धा तासात धावता आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे, बुधवारी या मुद्यांसह नवीन प्रकल्पांच्या संकल्पनांवरही मुंबईहून आलेल्या खास वास्तुशास्त्रज्ञांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात उत्कृष्ट वक्त्याला फड गाजविणे फारसे अवघड नसते. परंतु, निवडून आल्यावर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्यामुळे ‘निवडणुकीतील फड गाजविणे जितके सोपे, तितके प्रत्यक्षात काम करणे अवघड’ याची जाणीव हळूहळू होऊ लागते. मग, मनुष्य स्वभावानुसार वागणुकीत नकळतपणे काही बरे-वाईट बदलही घडतात. असे काही बदलही या दौऱ्यात प्रकर्षांने अधोरेखीत झाले.
संपूर्ण राज्यात मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकविषयी राज यांना शिवसेनेत असल्यापासून ममत्व आहे. परंतु, केवळ ममत्व असून शहराचा चेहरामोहरा पालटता येत नाही. इतकेच नव्हे, तर सत्ता असूनही फारसे काही साध्य होतेच, असाही सेनेत असतानाचा गतानुभव नाही. त्यामुळे ‘एकहाती सत्ता देऊन पहा, तुमच्या शहराचा संपूर्ण चेहरा बदलूून टाकतो’ असे आश्वासन प्रचारसभेत देणे वेगळे आणि ते प्रत्यक्षात साकारताना होणारी दमछाक वेगळी. अद्याप तसे म्हणजे राज यांच्या स्वप्नातील शहराप्रमाणे प्रत्यक्षात काहीही झालेले नाही, हा भाग अलहिदा. नाशिक महापालिका निवडणूक व सत्ता काबीज केल्यानंतरही भरभरून बोलणाऱ्या राज यांच्यावर अचानक मौन धारण करण्याची वेळ का आली असावी, हे न उलगडणारे कोडे आहे. परंतु, त्यांनी हे मौनव्रत केवळ जाहीरपणे बोलण्याबाबत बाळगले आहे हे खासकरून लक्षात घ्यावे. नाशिककरांविषयीच्या ममत्वात त्यांचे कोणतेही अंतर पडलेले नाही. त्यामुळेच त्यांनी यापूर्वी मुंबईहून खास पथक पाठवून केलेल्या संकल्पना व नियोजनाचा पट बुधवारी महापालिकेत पुन्हा संबंधितांच्या उपस्थितीत मांडला जाणार आहे. तत्पुर्वी, शहरातील विकासकामांविषयी राज यांनी महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याशी अर्धा ते पाऊण तास चर्चा केली. याप्रसंगी आ. वसंत गिते, आ. नितीन भोसले व महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, सुजाता डेरे असे निवडक शिलेदार उपस्थित होते. सत्तेत मनसेचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपच्या उपमहापौरांना निमंत्रण दिले होते की नाही, याची स्पष्टता होऊ शकली नाही.
महापौर दालनातील सभागृहात ही छोटेखानी बैठक पार पडली. दोन महिन्यांपूर्वी राज यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला. शहरातील रिंगरोडचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी जागा अधीगृहीत करण्यास अडचणी येत असल्यास संबंधित जागा मालकांना ‘टीडीआर’ किंवा जादा ‘एफएसआय’ देऊन हा विषय तातडीने मार्गी लावण्याचा सल्ला राज यांनी दिला. पालिकेच्या खत प्रकल्पापासून वीज निर्मिती करण्याची तयारी काही खासगी कंपन्यांनी दाखविली आहे. तो विषयही चर्चेत आला. घराघरातून कचरा जमा करणारी घंटागाडी व्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडली आहे. त्यात बदल करण्यासाठी काय काय करता येईल, याबद्दल त्यांनी विचारणा केली. गोदा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. नवीन केंद्रासाठी सोमेश्वर येथील जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात मिळणार असून त्यानंतर नदीपात्रात थेट सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर बरेचसे नियंत्रण येईल, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी गोदापार्कचा विषय आला नसता तरच नवल. रिंगरोड, सिंहस्थाच्यादृष्टीने करावयाची कामे अशा विविध मुद्यांवरही चर्चा झाली. यावेळी आयुक्तांनी पालिकेची आर्थिक स्थिती मांडली. विकास कामे करण्यासाठी कर्जरोखे काढावे लागतील. काही कामे बीओटी तत्वावर करावी लागतील, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या चर्चेनंतर राज यांचा ताफा पालिकेबाहेर पडला आणि विश्रामगृहात जाऊन विसावला. तेथेही दिवसभर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर त्यांची चर्चा सुरू होती.
राज यांच्या दौऱ्यातील पहिल्या दिवसाचे स्वरूप असे असले तरी जाहीरपणे त्यांनी कोणतेही वक्तव्य करणे टाळले. गेल्यावेळी पत्रकार परिषदेत प्रश्नांचा भडीमार झाल्यावर खुद्द राजही वैतागले होते. त्यामुळे यंदा जाहीरपणे काही बोलण्यापेक्षा ‘आपले काम भले आणि आपण भले’ असा त्यांच्या दौऱ्याचा रागरंग राहिला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते कदाचित जाहीरपणे काही बोलतीलही. पण, त्यांचा सत्ताप्राप्तीनंतर बदललेल्या स्वभावाचा आणखी एक वेगळा पैलू यावेळी असा बाहेर आला हे नाकारणे अवघड आहे.

Story img Loader