‘काखेत कळसा अन् गावाला वळसा’ ही वृत्ती समाजात खोलवर रुजली आहे. बाजारू मनोरंजनात कलेला गुदमरून टाकण्यापेक्षा आपल्यातील कला, संगीत हे गुण विकसित करा, असे आवाहन अभिनेते, दिग्दर्शक व लेखक गिरीश कुलकर्णी यांनी केले.
पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत झाली. प्रा. नंदकुमार कुलकर्णी व संजय जेवरीकर यांनी ही मुलाखत घेतली. कुलकर्णी हे लाहोटी तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी. आपल्याला लहानपणापासून नाटकाची आवड होती. स्पध्रेत भाग घेणे, बक्षिसे मिळविणे याचे कौतुक होत असे. निबंध स्पर्धा, काव्यवाचन प्रकारांतही आवड होती. येथूनच तंत्रनिकेतनची पदविका घेतली. बजाज कंपनीत नोकरी केली. मात्र, मशीनबरोबर खेळण्यात मन रमेना. रंगमंच हेच आपले आयुष्य हे सारखे मनच मनाला समजावत होते. मनाची साद लक्षात घेऊन अखेर धाडशी निर्णय घेतला. नोकरी सांभाळत प्रारंभी नाटकात काम केले. त्यातून स्वतबद्दलचा विश्वास वाढत गेला. आपण या क्षेत्रात नक्की काही चांगले करू शकतो, याची जाणीव झाली. पुण्यात वास्तव्याची संधी मिळाली. सांस्कृतिक राजधानीत सांस्कृतिक भूक सतत भागवली गेली. माणसे वाचण्यात आपण कायम मग्न असतो. माणसांशी गप्पा मारल्यावर नवनवीन पात्र सापडतात. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक हे पल्ले गाठता आले. नाटकात काम मागण्यासाठी कोणाकडे जावे लागले नाही. चित्रपटक्षेत्रात कमी कालावधीत चांगले यश मिळाले, कारण माझा माझ्यावर विश्वास होता. आजचा तरुण उत्सवात दंग आहे. कोणाची तरी कॉपी करण्यात मग्न आहे. आयुष्यात आपल्याला पुढे जायचे असेल तर स्वतमध्ये काय दडले आहे, याचा आधी शोध घ्या. आत्मविश्वास वाढीस लावण्याची जिद्द बाळगा. यश आपोआप चालून येईल, असेही गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले. रामचंद्र खंदारे, अजय पाटील, बसवराज उटगे, संजय अयाचित, प्राचार्य मधुकर सलगरे यांनी संमेलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.