मिरजेत गुरुवारी झालेल्या खुनाचे रहस्य अवघ्या चोवीस तासांत उकलले असून, मुलानेच वडिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपी मोहसीन निसार कुरुंदवाडे (वय २४) याला शुक्रवारी अटक करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता असणारा निसार गुलाब कुरुंदवाडे याचा खून झाला होता. हा खून राजकीय असल्याची बतावणी करणारा त्याचा मुलगा मोहसीन हाच आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी सांगितले.
निसार कुरुंदवाडे हे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरातून गायब झाले होते. त्याचा शोध घेण्यासाठी त्याचा मुलगा मोहसीन हा गेला होता. कोल्हापूर रोडवर उड्डाणपुलानजीक असलेल्या शेतात एका अज्ञात व्यक्तीबरोबर वडील नको त्या अवस्थेत दिसल्याचे पाहून संतप्त झालेल्या मोहसीनने त्यांचे डोके जवळच असलेल्या मोठय़ा दगडावर आपटले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Story img Loader