मुलांच्या संगोपनासाठी आयुष्यभराच्या कष्टातून कमवून ठेवलेल्या पुंजीवर मुलांनीच बेमालूमपणे डल्ला मारला. शिवाय उतार वयात वडिलांना आधार देण्याऐवजी त्यांनी कमावलेल्या संपत्तीमधील एक पैसाही या मुलांनी त्यांना मिळू दिला नाही. त्यामुळे नाइलाजाने वडिलांना दररोजचा निर्वाह आणि औषधोपचारासाठी हक्काच्या पुंजीतील रक्कम मिळण्यासाठी न्याययंत्रणेच्या दारात खेटे मारण्यास भाग पाडले. न्याययंत्रणेने या दोन्ही मुलांनी वडिलांना दरमहा पाच हजार रुपये द्यावेत, त्यांना घरात आसरा द्यावा असे आदेश दिले होते. तेही या मुलांनी नाकारले. त्यामुळे वडिलांना निर्वाह नाकारणाऱ्या डोंबिवलीतील या दोन मुलांना ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह २००७’ च्या कायद्याने कल्याणच्या उपविभागीय दंडाधिकारी डॉ. धनंजय सावळकर यांनी एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
या दोन्ही मुलांना रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवलकर यांनी अटक केली आहे. डॉ. सावळकर यांच्या आदेशावरून राजेश नारायण पोवळे व संजय नारायण पोवळे (रा. श्री साईनाथ सोसायटी, रामनगर) या दोघांना कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात पाठवण्यात आले. ‘महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ’ (फेस्कॉम) कोकण प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष रमेश पारखे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. स्वत:च्या खिशाला खार लावून, न्याययंत्रणेसमोर नारायण पोवळेंची बाजू मांडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. निर्वाह कायद्यांतर्गत अशा प्रकारची शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचा दावा पारखे यांनी केला. नारायण पोवळे (८३) सोनार होते. त्यांना दोन मुली, दोन मुलगे. जडजवाहिर घडवणे हाच त्यांचा व्यवसाय होता. या माध्यमातून मिळालेले पैसे त्यांनी बँकेतील ठेवी, दागिने रूपाने जतन केले होते. त्यांची फसवणूक करून दोन्ही मुलांनी या संपत्तीवर कब्जा केला. मुलांकडून छळवणूक सुरू झाली. वृद्धत्वामुळे त्यांना तीन हजार रुपयांचा औषधोपचारासाठी खर्च होता. तोही त्यांना देण्यात येत नव्हता. दोन्ही विवाहित मुली वडिलांचा सांभाळ करून त्यांच्या औषधोपचाराचा खर्च करीत होत्या. ‘फेस्कॉम’चे अध्यक्ष रमेश पारखे यांना हा सगळा प्रकार नारायण पोवळे (८३) यांनी सांगितला. ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह कायद्यान्वये’ ठाण्याचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे या दोन मुलांच्या विरुद्ध गेल्या दीड वर्षांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली.
ठाण्याचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी जगतसिंग गिरासे यांनी नारायण पोवळे यांची तक्रार, दोन्ही मुलगे, मुलींचे युक्तिवाद ऐकून गेल्या दीड वर्षांपूर्वी नारायण यांना त्यांच्या दोन्ही मुलांनी ‘दरमहा एकूण पाच हजार रुपये द्यावेत, घरात आसरा द्यावा, औषधोपचार व उदरनिर्वाहासाठी खर्च द्यावा, त्यांची गुंतवणूक रक्कम व दागिने परत करावेत’ असे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास एक महिन्यापर्यंतच्या शिक्षा ठोठावण्याचे आदेश दिले होते. दीड वर्ष उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने रमेश पारखे यांनी हे प्रकरण कल्याणचे उपविभागीय अधिकारी डॉ. धनंजय सावळकर यांच्यासमोर उपस्थित केले. डॉ. सावळकर यांनी दोन्ही मुलांनी न्याययंत्रणेचा अवमान करतानाच आदेशाची अंमलबजावणी न केल्याबद्दल त्यांना तीस दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा