लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या कंम्बाईंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस (सीडीएस) परीक्षेच्या भारतीय लष्करी प्रबोधिनीच्या यादीत ठाण्यातील अभय दिलीप कदम या तरूणाने स्थान पटकावले आहे. प्रबोधिनीत दीड वर्षांचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यदलात तो ‘लेफ्टनंट’ म्हणून रुजू होईल. या यादीत त्याचे नांव १९३ व्या स्थानावर झळकले आहे. अभयचे वडील ठाणे शहरात रिक्षा चालवितात. ठाण्यातील सावरकरनगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अभयला लष्करी कौटुंबिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. त्याचे आजोबा व काका मराठा रेजिमेंटमध्ये जवान म्हणून कार्यरत होते. ठाण्यातील इंदिरा गांधी विद्या मंदिरात शालेय शिक्षण घेणारा अभयने बारावीपर्यंतचे शिक्षण बी. ए. बांदोडकर महाविद्यालयात केले. विज्ञान शाखेच्या पदवी परीक्षेचे शेवटचे वर्ष सुरू असताना त्याने सप्टेंबर २०१२ मध्ये ‘सीडीएस’ची लेखी परीक्षा दिली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्याची मुलाखतीसाठी निवड झाली. मुलाखतीच्या विशेष प्रशिक्षणासाठी त्याला कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राम्हणकर, कमांडर (निवृत्त) प्रदीपकुमार बॅनर्जी व हृषीकेश आपटे यांचे मार्गदर्शन लाभले. लहानपणी ‘र्मचट नेव्ही’मध्ये जाण्याची इच्छा असलेल्या अभयने महाविद्यालयीन शिक्षणात ‘एन.सी.सी’च्या नौदल गटात प्रवेश घेतला होता. त्या ठिकाणी त्याची लष्करातील काही अधिकाऱ्यांशी भेट झाली. लष्करातील प्रवेश परीक्षेविषयीची त्यांच्याकडून माहिती जाणून घेतल्यावर त्याचे मत परिवर्तन झाले आणि तो सीडीएस परीक्षेच्या मागे लागला. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची प्रवेश परीक्षाही दिली होती.

Story img Loader