बॉलिवूडच्या अथांग समुद्रात मोठे मासे नेहमीच छोटय़ा माशांना गिळत असतात. या दुनियेतील ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाचा फटका आता अजय देवगणला बसला आहे. सगळ्यात आधी ‘सन ऑफ सरदार’साठी १३ नोव्हेंबर ही चित्रपट प्रदर्शनासाठीची तारीख घेऊनही यशराजच्या मक्तेदारीमुळे वाटय़ाला १८०० पैकी अवघी ६०० सिंगल स्क्रीन थिएटर आल्याने वैतागलेला अजय उच्च न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी गेला. न्यायालयाने सीसीआयच्या कोर्टात (कॉम्पीटिशन कमिशनर ऑफ इंडिया) चेंडू टाकला. आणि प्रदर्शनाची तारीख तोंडावर आली असताना अजयच्या मागणीत तथ्यच नसल्याचे सांगत सीसीआयने त्याचा अर्जच फेटाळून लावला आहे. या निर्णयाने अजयच्या ‘सरदार’चा खरोखरच जीव गेला आहे.
अजय देवगण प्रॉडक्शनच्या ‘सन ऑफ सरदार’ची घोषणा आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख खूप आधीच झाली होती. मात्र, त्यानंतर यशराज फिल्म्सने आपला ‘जब तक है जान’ त्याच तारखेला १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्याची घोषणा केली. एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या दोन चित्रपटांमध्ये टक्कर होणे अपेक्षित होतेच. पण, अजय देवगण प्रॉडक्शन्सने आधीच राखीव केलेल्या देशभरातल्या १८०० सिंगल स्क्रीन्सपैकी केवळ ६०० स्क्रीन्स त्याला मिळाली. यशराजने मल्टिप्लेक्सबरोबर सिंगल स्क्रीन्सही स्वतकडे खेचून घेतल्याने आपल्या चित्रपटाला कमी थिएटर्स मिळत असल्याची तक्रार अजयने के ली आणि यशराजला उच्च न्यायालयात आव्हान दिले. अजयची बाजू समजावून घेतल्यानंतर सीसीआयने या दोन चित्रपटांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले. मात्र, सीसीआयने यशराजने कोणत्याही प्रकारे मक्तेदारी केलेली नाही. अजय देवगणने केलेल्या तक्रारीप्रमाणे कुठल्याही स्पर्धात्मक नियमांचा भंग झालेला या दोन्ही चित्रपटांच्या बाबतीत आढळून येत नाही, असे सांगत अजयची याचिकाच फेटाळून लावली आहे. त्यामुळे एकतर आहे त्या सिंगल स्क्रीन्समध्ये चित्रपट प्रदर्शित करणे किंवा चित्रपट प्रदर्शनाची तारीख बदलणे यापैकी एका पर्यायाची अपरिहार्य निवड अजयला करावी लागणार आहे. या दोन्ही गोष्टी त्याच्या फायद्याच्या नाहीत त्यामुळे खरोखरच यशराजच्या ‘जब तक है जान’ने त्याचा जीव काढला आहे, एवढे नक्की.
सीसीआयचा निर्णय धक्कादायक!
सीसीआयने आम्ही केलेली न्याय्य हक्काची मागणी फेटाळून लावली. त्यांचा हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे, असे अजय देवगणने म्हटले आहे. सीसीआयच्या निर्णयाविरोधात वरच्या लवादाकडे दाद मागणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. एकंदरीतच यशराजच्या मक्तेदारीला न घाबरता आपला किल्ला लढवायचा निर्धार ‘सरदार’ने केला आहे, असे दिसते. अर्थात, अजय देवगणचा हा निर्धार शाहरूखच्या दिवाळीचा थोडक्यात बेरंग करणार.
‘जब तक है..’मध्ये अडकली ‘सरदार’ची जान
बॉलिवूडच्या अथांग समुद्रात मोठे मासे नेहमीच छोटय़ा माशांना गिळत असतात. या दुनियेतील ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाचा फटका आता अजय देवगणला बसला आहे.
First published on: 09-11-2012 at 01:00 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son of sardar movie gets minmum theaters because of jab tak hai jaan movie