‘फेसबुक’चा गैरवापर होत असल्याच्या घटना ताज्या असताना माहीममधल्या एका शाळकरी विद्यार्थ्यांने ‘फेसबुक’वरून आपल्या वडिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पोलिसांकडून मदत मिळत नसल्याने या मुलाने साहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना ‘फेसबुक’वर गाठून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला.
माहीमच्या गिरगावकर वाडीत संतोष नाई आपल्या कुटुंबासह राहतात. नाई यांचा स्थानिक विकासकाबरोबर जागेवरून वाद होता. त्या वादातून नाई यांना धमक्या मिळत होत्या आणि नोव्हेंबर महिन्यात गुंडाकडून मारहाणही झाली होती. पोलिसांकडे गेल्यावरही त्यांना सहकार्य मिळत नव्हते आणि मुख्य आरोपीवर कारवाई होत नव्हती. यामुळे संतोष नाई हतबल आणि निराश झाले होते. त्यांचे कुटुंबीयसुद्धा गुंडांच्या त्रासामुळे भयभीत झाले होते.
किरण हा विक्रोळी हायस्कूलचा विद्यार्थी आहे. तर संतोष नाई यांचे शिवणकामाचे दुकान आहे. आपल्या वडिलांची ही अगतिकता त्यांचा आठवीत शिकणारा १४ वर्षांचा मुलगा किरण याला अस्वस्थ करायची. त्याने वडिलांवर होत असलेला अन्याय ‘फेसबुक’वर मांडला. बारवर बेधडक कारवाई करणारे वसंत ढोबळे या अधिकाऱ्याचे नाव तो ऐकून होता. त्याने ढोबळेंना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून मदत मागितली. ढोबळे यांना या मुलाच्या संदेशाला प्रतिसाद देत ‘फेसबुक’वरूनच विचारपूस केली. हा प्रकार वडिलांना कळताच त्यांना मुलाचे कौतुकही वाटले आणि धीरही आला.
आपला मुलगा आपल्यासाठी लढतोय. मग आपण हिंमत का सोडतोय, असा विचार करून त्यांच्या मनाने उभारी घेतली. त्यांनी परिमंडळ पाचचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांची मुलासह भेट घेऊन प्रकार कानावर घातला. कुलकर्णी यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत कारवाईचे आदेश दिले. माझ्या मुलाने मला हिंमत मिळवून दिली, म्हणून मी मोठय़ा हिमतीने लढतोय. आता मला पूर्ण न्याय मिळेल, असा विश्वास नाई यांनी व्यक्त केला. मी फेसबुकवरून माझ्या अनेक मित्रांना या प्रकाराबद्दल सांगितले. ढोबळे सरांनी मला प्रतिसाद देत आमची समस्या ऐकून घेतली.. ही आमच्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट असल्याचे किरणने सांगितले.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son on facebook to give justice to father