मंदिराभोवती उभारलेल्या इमारतींमुळे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा किरणोत्सव होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असताना मावळणाऱ्या सूर्याची किरणे पहिल्याच दिवशी महालक्ष्मीच्या चरणापासून थेट कमरेपर्यंत गेली. त्यामुळे किरणोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून जात असल्याचे चित्र शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात पहावयाला मिळाला.
भारतीय पुरातन स्थापत्य शास्त्राचा अव्दितीय नमुना म्हणून महालक्ष्मी मंदिराकडे पाहिले जाते. दरवर्षी महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा पार पडतो. मावळणाऱ्या सूर्याची किरणे सलग तीन ते चार दिवस महालक्ष्मीच्या मूर्तीवर येत असतात. चरणापासून ते टप्प्याटप्प्याने देवीच्या मुखकमलापर्यंत किरणे पडत जातात. हा अनुभव घेण्यासाठी किरणोत्सवकाळात भाविकांची मोठी गर्दी झालेली असते.
गेल्या काही वर्षांत महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस उंच-उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामुळे किरणोत्सवात अडथळे येणार अशी दाट शक्यता वर्तविली गेली होती. तथापि देवीचा वार म्हणून समजल्या जाणाऱ्या शुक्रवारी किरणोत्सवाचा पहिला दिवस निर्विघ्नपणे पार पडला. पहिल्या दिवशी सूर्याची किरणे देवीच्या कमरेपर्यंत गेल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान तरळत होते.
दरम्यान दिवाळीपासून ते पौर्णिमेपर्यंत महालक्ष्मी मंदिरात कार्तिकस्नान सोहळा होणार आहे. या कालावधीत मंदिरातील
शिखरावर दररोज काकडा प्रज्वलित केला जातो. हा सोहळा अनुभविण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते.       

Story img Loader