सध्या भरजरी गुलाबी साडी नेसून, सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली सोनाक्षी सिन्हा अगदी सुहास्य वदनाने सुदूर शहापूर किंवा अंबरनाथमध्ये बांधण्यात येत असलेल्या घरांच्या जाहिराती करते आहे. सोनाक्षीला या जाहिरातीत पाहिल्यानंतर शहापूरमध्ये बांधलेल्या घरांची जाहिरात कशाला करतेय?, असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला. पण, ही जाहिरात सोनाक्षीच्या वाटय़ाला आली आहे ती तिच्या भावांच्या ‘कर्मा’ने. शत्रुघ्न सिन्हाचा मुलगा लव सिन्हा याने आता वडिलांच्या ‘शॉटगन मूव्हीज’या निर्मितीसंस्थेचा कारभार हातात घेतला असून या बॅनरखाली त्याने ‘कर्मा’ रिअल इस्टेटची पहिली जाहिरात केली आहे. तर त्याचा भाऊ कुश याने जाहिरात दिग्दर्शित केली आहे. ‘माझे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी स्थापन केलेली निर्मितीसंस्था असल्याने तिचा लौकिक कायम राहिला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या या बॅनरखाली चित्रपटनिर्मिती करायचे माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सध्या अनेक पटकथांवरही काम सुरू आहे. लवकरच ‘ओएमजी’फेम उमेश शुक्ला दिग्दर्शित एक राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट पहायला मिळेल, असे लवने ‘वृत्तान्त’ला सांगितले होते. मात्र, पटकथा शोधता शोधता त्यांच्या हाती ‘कर्मा’ रिअल इस्टेट च्या जाहिरातीचे काम आले आणि ‘शॉटगन’मधून पहिली जाहिरात आणायचा विचार त्यांनी पक्का केला. घरचा बॅनर, बहीण सोनाक्षी आता स्टार कलाकार असल्याने तिलाच घेऊन लव आणि कुशने ‘कर्मा’ची जुळवाजुळव करून आणली आहे. मात्र, आता ‘कर्मा’च्या जाहिरातीनंतर तरी लव-कुशला इंडस्ट्रीत त्यांच्या कर्माची योग्य दिशा मिळतेय की नाही ते लवकरच कळेल.