चौदा तपासणी पथकांना महिनाभरात कोठेच गैरप्रकार आढळला नाही!
मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेऊन स्त्रीभ्रुणहत्या टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राज्यात १ ते ३० जूनदरम्यान सोनोग्राफी व गर्भजल तपासणी केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत जिल्ह्य़ातील २३ सोनोग्राफी व २९ गर्भजल केंद्रांची चौकशी झाली असून कोठेही गरप्रकार होत नसल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्ह्य़ात एकाही केंद्राचा गरकारभार उघड झाला नसल्याने खरोखरच ही केंद्रे नियमित कायदेशीर चालतात का, की तपासणी पथकाला अपयश आले, हा खरा प्रश्न आहे.
या धडक मोहिमेत पहिल्याच दिवशी आठ केंद्रांची तपासणी करण्यात आली. या चौकशीमुळे जिल्ह्य़ातील अवैध सोनोग्राफी व गर्भजल केंद्रचालकांमध्ये खळबळ उडाली होती. सोनोग्राफी व गर्भजल केंद्रांच्या अवैध कारभाराची तपासणी करण्यासाठी ग्रामीण भागात आठ, तर शहरी भागात पाच पथके तपासणीसाठी तयार करण्यात आली होती. या पथकांनी महिनाभर चौकशी केल्यावर कोठेही गरप्रकार आढळून आला नाही, अशी माहिती प्रमुख डॉ. के.के. त्रिपाठी यांनी दिली.
जिल्ह्य़ात देवरी, अर्जुनी मोरगाव, तिरोडा यासह गोंदियातील केटीएस व गंगाबाई रुग्णालय या पाच ठिकाणीच शासकीय सोनोग्राफी केंद्रे असून, इतर खाजगी केंद्रांसह २३ सोनोग्राफी केंद्रे आहेत. खासगी केंद्रांवर पशाच्या लोभापायी अवैधरित्या गर्भपात व गर्भजल परीक्षण केले जात असल्याची जिल्ह्य़ात ओरड होती. त्यामुळेच मुलींचा जन्मदर घटत आहे. या अवैध प्रकाराला लगाम घालण्यासाठी १४ पथकांनी कंबर कसली.  परंतु, ही मोहीमच फुस्स ठरली आहे.
मोहिमेदरम्यान केंद्रांच्या कागदपत्रांसह रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. नियमबाह्य़ आढळणाऱ्या केंद्रांवर कारवाई होणार असल्याने सर्वच केंद्रचालकांनी पूर्वीच आपापले रेकॉर्ड ‘अपडेट’ करून ठेवले होते. त्यामुळे पथकांना यश आले नाही. या पथकांमध्ये एक डॉक्टर, पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी व कायदेविषयक सल्लागारांचा समावेश होता. तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी पथकप्रमुख होते. या चौकशीची प्रत्येक दिवसाची माहिती पुणे येथील माता व बालसंगोपन संचालकांना पाठविण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा