तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या विजेचा अडचणी मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून, जळणाऱ्या वीज रोहित्रांच्या तक्रारीही असंख्य आहेत. याबाबत पंचायत समिती कार्यालयात बैठक घेणार असून, शेतकरी व नागरिकांनी विजेच्या अडीअडचणी लेखी स्वरूपात संजीवनी कारखाना कार्यालयाकडे पाठवाव्यात, असे आवाहन संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले आहे.
कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की छोटय़ा पाच ते सात शेतकऱ्यांसाठी कमी अश्वशक्तीचे रोहित्र मंजूर झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र ही योजना तालुक्यात पोहोचवली नाही. कोपरगाव शहराच्या भूमिगत विद्युतीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र त्याचे कामही अद्याप सुरूच झालेले नाही.
यंदा तालुक्यात जेमतेम पाऊस पडला आहे. सध्या विहिरींना पाणी असूनही ते जळणाऱ्या वीज रोहित्रांच्या तक्रारींमुळे पिकांना देता येत नाही. त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. जे रोहित्र जळाले त्याची दुरुस्ती केली, मात्र ते गॅरंटी पिरियडमध्येच जळाले. अशांची दुरुस्तीही वीज वितरण कंपनीचे अधिकारी करून देत नाही. त्यासाठी पैशाची मागणी करून शेतकऱ्यांची अडवणूक करतात. विजेची बिले भरून शासनास व मंडळास सहकार्य करण्याची आमची भूमिका आहेच. मात्र विजेच्या छोटय़ा छोटय़ा अडचणीसाठी अधिकारी अडवणूक करतात. थकीत वीजबिलाबाबत रोहित्र बंद करणे, वीज तोडणे या मार्गाने त्रास देतात. या कारभाराला शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळेच बैठक घेऊन या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आहे, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा