संगणकीकृत सातबारा तयार करण्यासाठी दोष दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच मोबाइलवर सातबारा जमीनमालकांना दिला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
सुवर्णजयंती राजस्व योजनेंतर्गत समाधान योजना व अन्नसुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे हे होते. या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार दयाल, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, सभापती दीपक पटारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर, उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सध्या खरेदी-विक्री व्यवहारानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी १५ दिवस मुदतीची नोटीस प्रसिद्ध करावी लागते. ही अट काढण्यासाठी विधी व न्याय खात्याची परवानगी मागितली आहे. ती मिळाल्यानंतर यापुढे व्यवहार नोंदविल्यानंतर लगेच सातबाराचा उतारा मिळेल. तसेच सरकारच्या विविध योजनांसाठी नागरिकांना विविध कार्यालयांत हेलपाटे मारावे लागतात. अशी वेळ येऊ नये म्हणून समाधान योजना सुरू करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
प्रांताधिकारी प्रकाश थवील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्हाधिकारी संजीवकुमार, आमदार कांबळे, ससाणे यांची भाषणे झाली. आभार सभापती दीपक पटारे यांनी मानले. या वेळी गिरिजाबाई महाजन, हिराबाई चव्हाण, दादासाहेब गोलवड यांना प्रातिनिधिक स्वरूपात धान्यवाटप करण्यात आले.

Story img Loader