गेली काही वर्षे सातत्याने आवाजी फटाक्यांविरोधात करण्यात येत असलेल्या प्रबोधनाचा परिणाम यंदा ठाणे शहरात दिवाळीच्या दिवसात दिसून आल्याचे महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. दिवाळीच्या दिवसात १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान शहरात कोपरी, नौपाडा, रायलादेवी या परिसरात घेण्यात आलेल्या नोंदीनुसार यंदा आवाजी फटाक्यांच्या वापरात लक्षणीय घट झाल्याने ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण घटले, मात्र दुसरीकडे शोभेच्या फटाक्यांच्या वापरामुळे वायुप्रदूषण मात्र वाढले.
उपरोक्त तिन्ही ठिकाणी केलेल्या ध्वनिमापनानुसार यंदा दिवाळीत प्रदूषणाची पातळी किंचित कमी होती. कोपरीमध्ये सरासरी किमान ७४ तर कमाल ९२ डेसिबल्स ध्वनिपातळी नोंदली गेली. नौपाडा शाहू मार्केट परिसरात किमान ५८ तर कमाल ७४ डेसिबल्स तर रायलादेवी प्रभागात किमान ६० तर कमाल ८२ डेसिबल्स ध्वनीची नोंद झाली. गणेशोत्सवातील मिरवणुकीदरम्यान शहराच्या काही भागात शंभर डेसिबल्सपेक्षा अधिक ध्वनिमापन झाले होते. गेल्या वर्षी दिवाळीत हवेचा प्रदूषण निर्देशांक ६७ टक्के होता. यंदा हे प्रमाण ५१ टक्के इतकेच आढळून आले. शोभेच्या अथवा फॅन्सी फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा