आपल्याला राजकारणातून दूर करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यावर योग्य वेळी खुलासा करीनच; पण मी संपणार नाही आणि काँग्रेसला संपवू देणार नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत, तसेच पक्षबाहेरील विरोधकांना उत्तर दिले.
काँग्रेस पक्षाच्या मिशन लोकसभा २०१४अंतर्गत सोमवारी वामनराव पावडे मंगल कार्यालयाच्या मदानात आयोजित विराट मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री डी. पी. सावंत, खासदार भास्करराव खतगावकर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव, मुख्य आयोजक आमदार अमरनाथ राजुरकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
तब्बल चार तास चाललेल्या या मेळाव्यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून चव्हाण हेच उमेदवार असल्याचे सूचित केले गेले. पण खुद्द चव्हाण यांनी पक्ष देईल तो उमेदवार स्वीकारण्याची भूमिका मांडताना त्याला निवडून आणण्यास आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
विरोधी पक्ष व त्यांच्या नेत्यांकडून सुरू असलेला अपप्रचार, तसेच राजकारण कुठल्या दिशेने चालले आहे हे ओळखण्याची गरज आहे; असे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले की, अशा वातावरणात आपले घर पडले, तर ते परवडणारे नाही. कार्यकर्त्यांनी माझी चिंता करू नये, घर मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला नांदेड लोकसभा मतदारसंघावर तिरंगा फडकवायचा आहे. इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण, नोकरी आदी क्षेत्रांत आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. िहगोलीची जागा काँग्रेसला सुटली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची मागणी असली तरी ही बाब माझ्या अखत्यारित नाही. पण कार्यकर्त्यांची भावना मी श्रेष्ठींपर्यंत पोहोचवेन. रात्र वैऱ्याची आहे. डोळ्यात तेल घालून हताश न होता कामाला लागा, असेही ते म्हणाले.
मेळाव्याला सुमारे १० हजार कार्यकत्रे उपस्थित होते. त्यांना उद्देशून प्रत्येकांनी किमान शंभर लोकांना भेटून युपीए व राज्य सरकारने केलेल्या कामाची माहिती द्यावी. तसेच आपल्यावर होत असलेल्या आरोपांमधील वस्तुस्थिती सांगावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी इतरही लोकप्रतिनिधींची भाषणे झाली. मेळाव्यास नांदेडसह लातूर व िहगोली जिल्ह्यांतील कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मेळाव्यास वेगवेगळ्या वाहनांमधून कार्यकत्रे आल्याने पावडे मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता पूर्णत काँग्रेसमय झाला होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती. मेळाव्याचे सुरेख नियोजन केल्याने कोणताही गोंधळ उडाला नाही, वा गडबड झाली नाही.
अशोक चव्हाण गरजले
आपल्याला राजकारणातून दूर करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यावर योग्य वेळी खुलासा करीनच; पण मी संपणार नाही आणि काँग्रेसला संपवू देणार नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत, तसेच पक्षबाहेरील विरोधकांना उत्तर दिले.
First published on: 28-01-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound of ashok chavan congress