दक्षिण नागपुर
जातीय व पक्षीय समीकरणे पार धुडकावून लावत सुधाकर कोहळे पर्यायाने भाजपवर विश्वास दाखवून केवळ आणि केवळ प्रामाणिकतेने विकासासाठी इच्छुक असल्याचे दक्षिण नागपुरातील मतदारांनी दाखवून दिले आहे.
दक्षिण नागपूर मतदारसंघ परत मिळविण्यासाठी भाजपची यंदा कसोटी लागली. नितीन गडकरींना दक्षिण नागपूरातून १ लाख ५ हजार मते मिळाली. विधानसभेत मात्र ८१ हजार २२४ मते मिळाली. कोहळेंना उमेदवारी दिल्याने भाजपमधील काही इच्छुक नाराज झाले होते. गडकरींनी खडसावल्याने हे बंडोबा प्रचारात दिसू लागले तरी अनेकांची उपस्थिती केवळ ‘दाखविण्या’पुरतीच होती, हे सत्य लपून राहिलेले नाही.
पूर्व नागपूर मतदारसंघातील ७० टक्के भाग दक्षिण नागपूर मतदारसंघात आल्याने सतीश चतुर्वेदी यांनी इकडे उडी घेतली खरी. ते पाहून आमदारकी टिकविण्यासाठी दीनानाथ पडोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घडय़ाळ बांधले. काँग्रेसकडे हा मतदारसंघ कायम ठेवण्यास व पुन्हा आमदारकी मिळविण्यास चतुर्वेदींनी सारी शक्ती पणाला लावली. शिवसेनेचे किरण पांडव व अपक्ष शेखर सावरबांधे यांच्या रिंगणातील उपस्थितीने पंचरंगी काटय़ाची लढत झाली. अनेक काँग्रेसजनांनी चतुर्वेदींना धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले.
नितीन गडकरी व गिरीश व्यास यांनी चाळीस वर्षांपासून रामभाऊ म्हाळगी नगर, बिडीपेठ, हुडकेश्वर, संजय गांधीनगर, अयोध्यानगर, सोमवारी क्वार्टर आणि इतर अनेक वस्त्यांत भाजपची पाळेमुळे रुजविली. त्याचेच फळ म्हणून नागरिकांनी महापालिका, लोकसभा व आता विधानसभेत विश्वास दाखवून भाजपला पसंती दिली. आतातरी शिवसेनेने हे सत्य मानायलाच हवे. जातीय समीकरणांचे पूल बांधून विजयाचे आराखडे बांधणाऱ्यांनाही या कोहळेंच्या विजयाने सणसणीत चपराक लगावली. कोहळेंच्या रुपाने डमी उमेदवार दिल्याचा होणारा आरोप खोटा ठरला. संघ स्वयंसेवक आणि भाजपच्या निष्ठावंतांसह इतर सर्वसामान्य मतदारांनी जातीय व पक्षीय समीकरणे धुडकावून लावली आणि प्रामाणिकपणे विकासाची अपेक्षा ठेवून त्यासाठी भाजपवर विश्वास दाखवला असल्याचे स्पष्ट झालेआहे. काही नाराजांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन ठरले. राजकारणापलिकडील मैत्र जरूर जपावे मात्र त्यासाठी पक्षाशी गद्दारी करू नये, असाही एक महत्त्वाचा संदेश या विजयाने दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा