सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पेरण्यांची कामे खोळंबली असून चंद्रपूर शहर, तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. भद्रावती येथे किल्ला वॉर्डात घर कोसळल्याने सोनाबाई बापूराव ठेंगणे या ७० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला.
या जिल्ह्य़ात रविवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. शहराप्रमाणेच जिल्ह्य़ातील पंधराही तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने ग्रामीण भागात पेरण्यांची कामे खोळंबली आहे. नदी-नाले तुडूंब वाहत असून मनपाने उन्हाळ्यात नाल्यांची सफाई न केल्यामुळे सर्व घाण रस्त्यांवर आली आहे. या शहरातील महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गावर पाणीच पाणी होते, तर रहमतनगर, महसूल कॉलनी, रामनगर, ठक्कर कॉलनी या भागात रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पहिल्याच पावसात इरई, झरपट व वर्धा नदीला पाणी आले आहे. यासोबतच शहराला लागून असलेले मोठे नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
वरोऱ्यात तर नाले तुडूंब भरल्याने पंधरा ते वीस घरात पाणी शिरले. नगर पालिकेने वेळीच दखल घेतल्याने कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही, तर भद्रावतीत सततच्या पावसामुळे किल्ला वॉर्डात सोनाबाई बापूराव ठेंगणे या वृध्द महिलेचा घर कोसळल्याने मृत्यू झाला. बापूराव ठेंगणे यांचे लादणीचे घर आहे. दोन दिवसाच्या पावसामुळे या घराच्या भिंतीला पूर्ण ओल आली होते. आज सकाळी बापूराव ठेंगणे शौचाला गेले असतांना सोनाबाई झोपल्या होत्या. नेमक्या त्याच वेळी घर कोसळले आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रंगनाथ ठेंगणे, छाया ठेंगणे, योगिनी ठेंगणे, जयश्री ठेंगणे हे दुसऱ्या खोलीत झोपले असल्याने बचावले. जिल्ह्य़ात इतरही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून अनेक घरांची पडझड झालेली आहे. तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील बचाव कक्ष माहिती गोळा करत आहेत. पावसाने उघाड दिल्यानंतरच पेरणी करता येईल, असे कृषी अधीक्षक कुरील यांचे म्हणणे आहे. सध्यातरी शेतकरी पाऊस कधी विश्रांती घेतो याकडे डोळे लावून बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा