जिल्ह्य़ात खरीप हंगामात ३ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित असून कापसाच्या क्षेत्रात घट होऊन या वर्षी सोयाबीन व तूर पिकांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला.
जिल्ह्य़ाचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ५२ हजार ६०० हेक्टर असून सरासरी पर्जन्यमान ८९० मिमी आहे. खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७९ हजार ४६८ हेक्टर आहे. सोयाबीन, कापूस, खरीप, ज्वारी, तूर ही प्रमुख पिके आहेत. खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन १ लाख ६५ हजार हेक्टर (४३ टक्के वाढ), कापूस १ लाख २० हजार हेक्टर (७.०६ टक्के घट), ज्वारी २५ हजार हेक्टर (५ टक्के वाढ), तूर ३० हजार २५० हेक्टर (१४ टक्के वाढ) असे क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. शिवाय मूग, उडीद, बाजरी, तीळ, मका, सूर्यफूल ही पिके काही प्रमाणात घेतली जातात.
विविध पिकांची ९५ हजार ९०७.५० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली गेली. महाबीजमार्फत १६ हजार १०० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. जिल्ह्य़ात विविध पिकांचे ८४ हजार ३१६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी सांगितले. जिल्ह्य़ात बीटी कापूस बियाण्याची ६ लाख पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली असून मेअखेर ३ लाख १५ हजार ५०० पॅकेट उपलब्ध झाले. ८६ हजार ६२३ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी नोंदविली. त्यातून महाबीजमार्फत १४ हजार ८३५ क्विंटल बियाणे पुरवठा होणार आहे. १४ हजार क्विंटल बियाण्याची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली.

Story img Loader