यवतमाळसह जिल्ह्य़ात बुधवार आणि गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने तोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकांच्या केलेल्या प्रचंड नासाडीने झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने तातडीने करून शेतकऱ्यांच्या संभाव्य आत्महत्या टाळण्यासाठी पाऊल उचलावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष मतभेद विसरून एकत्र येत असल्याचे अपूर्व दृष्य दिसत आहे.
नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडवणाऱ्या विजांचा प्रचंड गडगडाट आणि ढगफुटीचा अनुभव यावा इतक्या भयंकर वेगाने कोसळणाऱ्या परतीच्या मुसळधार पावसाने जवळपास एक तास जबरदस्त तडाखा देऊन जिल्ह्य़ात अक्षरश तांडव केले. शिवाय, वीज कोसळल्याने चौघांचे बळी घेऊनच या पावसाने परतीचा प्रवास केला. उल्लेखनीय म्हणजे, सोयाबीनचे पीक तोंडाशी आले असतांना यापूर्वीच पावसाने सोयाबीन पिकाला कोंब यायला लागले आहेत. ज्याची कापणी झाली आणि शेतात ढीग उभे झाले त्याचेही पीक पावसाने उध्वस्त केले आणि उभ्या पिकांचाही बोऱ्या वाजवून टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात न आटणाऱ्या अश्रूधारा वाहत असल्याचे ह्रदयद्रावक चित्र आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी घेतलेल्या नुकसानीच्या आढाव्यावर विश्वास ठेवला तर सोयाबीन उत्पादनात ७५० कोटी रुपयांची घट होणार, असे दिसते. जिल्ह्य़ात ३.७५ लाख हेक्टर क्षेत्रात यंदा सोयाबीनची लागवड झाली. सुरुातीपासूनच पावसाने कृपा केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची ठरेल, असे वाटत होते, पण या वरुणराजाने इतकी वक्रदृष्टी केली की, प्रकाशाचा सण असलेली दिवाळी आता मात्र घनघोर अंधारातच शेतकऱ्यांना साजरी करावी लागणार आहे. कृषी विभागाने घेतलेल्या नुकसानीच्या अंदाजानुसार ७० टक्के पीक वाया गेल्याचे समजते. उत्पादनातही ६० टक्केपेक्षा घट होणार हेही स्पष्ट झाले आह. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी प्रा. वसंत पुरके यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनीही म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. यासाठी आवश्यक ती सर्व मदत शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ आणि गरज पडल्यास आंदोलनासाठीही सज्ज राहु. शिवसेनेचे आमदार संजय राठोड, खासदार भावना गवळी यांनीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला साकडे घातले आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी सेनेने मागणी केली आहे.