सोयाबीन पिकाची काढणी सुरू झाल्यानंतर तब्बल ५ महिन्यांनी सोयाबीनच्या भावात १०० रुपये वाढ झाली. बाजारपेठेत सोयाबीनची आवक सध्या सुरू आहे.
शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत आल्यानंतर भाव घसरतात व हंगाम संपल्यानंतर वाढतात, हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव शेतकऱ्यांना अंग़ळळी पडला आहे. त्यासाठी जागतिक बाजारपेठेचा दाखला काही मंडळी देत असतात. सामान्य शेतकऱ्याला जगातील व्यापाराची माहिती नसते, त्यामुळे मिळालेल्या माहितीवर त्याला विसंबून राहावे लागते. गतवर्षी ऑगस्टमध्ये सोयाबीनचे भाव ५ हजार २०० रुपयांपर्यंत वधारले होते. दि. १ ऑक्टोबरला सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यानंतर भाव ३ हजार १०० रुपयांपर्यंत घसरले. त्यानंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर ५ महिन्यांत ३१००-३२०० रुपयांदरम्यान भाव टिकून होते. भाव वाढतील म्हणून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी किंवा गोदामात ठेवले त्यांची मात्र चलबिचल झाली. सोयाबीनच्या भावात कधी व किती भाववाढ होईल? या चर्चेत या शेतकऱ्याला रस आहे. दि. १ मार्चला सोयाबीनचा भाव ३ हजार २२५ रुपये होता. बुधवारी तो ३ हजार ३३५ रुपयांवर वधारला. पाच दिवसांत तब्बल ११० रुपयांची भाव वधारण्याचे नेमके कारण काय? या संबंधी कीर्ती उद्योग समूहाचे अशोक भुतडा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, इराणमध्ये सोयाबीनच्या पेंडीची निर्यात भारतातून होत आहे. इराण नेहमी ज्यांच्याकडून सोयाबीनची पेंड खरेदी करते, त्यात तांत्रिक कारणामुळे खंड पडला व ऐनवेळी भारतातून सोयाबीनची पेंड त्यांनी घ्यावी लागली. या कारणामुळे ही भाववाढ आहे. भाववाढ इराणला निर्यात सुरू असेपर्यंत राहील. त्याचा नेमका कालावधी किती काळ असेल हा अंदाज करणे अवघड असल्याचे ते म्हणाले.  कायमस्वरुपी अधिक भाव मिळण्यासाठी केंद्राने तेलाच्या आयातीवर शुल्क आकारले पाहिजे. ते आकारले गेले तर ४ हजार रुपयांपर्यंत भाव शेतकऱ्याला मिळू शकतो. केंद्राच्या निर्णयावरच या बाबी अवलंबून असल्याचेही ते म्हणाले. बाजारपेठेत फॉरवर्ड मार्केटिंगच्या अंदाजानुसार मार्च व एप्रिलमध्ये सोयाबीनचा बाव ३ हजार ४१० रुपयांपर्यंत जाईल. मे व जूनमध्ये तो ३ हजार ३६० ते ३ हजार ३७०पर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे.  ऐनवेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे चित्र बदलल्यास भावात बदल होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा