राज्यात गेल्या वर्षीपेक्षा सुमारे आठ लाख मेट्रिक टन जास्त सोयाबीनच्या उत्पादनाचा अंदाज आणि विक्रमी निर्यातीची संधी असूनही विदर्भातील बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा विपरीत प्रभाव सहन करावा लागणार आहे.
खरीप हंगामात महाराष्ट्रात ३८ लाख ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यापैकी तब्बल १९ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे. गेल्या वर्षी राज्यात ३२ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली होते. भारतीय सोयाबीन प्रक्रिया संस्थेने (सोपा) यंदा राज्यात ४८.५६ लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. देशातील इतर सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने उत्पादन वाढून सुमारे ४.१ दशलक्ष टन विक्रमी सोयाबीनची निर्यात होईल, असा कयास आहे. सोयाबीन उत्पादकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता असली तरी विदर्भातील शेतकऱ्यांना यंदा या संधीपासून पावसाने वंचित ठेवले आहे. जून, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर, चंद्रपूर, वाशीम आणि वर्धा जिल्ह्य़ात सोयाबीनला मोठा फटका बसला. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्य़ातही हानी झाली. काही भागात सोयाबीनचे उत्पादन चांगले होईल, असे चित्र असतानाच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित विस्कटून गेले आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरतो, पण यंदा पूर्ण विदर्भात ऑक्टोबरच्या सरासरीच्या दोनशे ते तीनशे टक्के पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत पावसामुळे सोयाबीन काढता आले नाही. झाडावरच कोंब फुटले, काढणीवर आलेले सोयाबीन कुजले. त्यामुळे सुमारे ४० टक्के सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण अजूनही सुरू आहे. या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले, याचा आकडा समोर आलेला नाही, पण या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. गेल्या वर्षी राज्यात सोयाबीनची उत्पादकता १२४३ किलोग्रॅम प्रति हेक्टर होती, यंदा ती १२५५ किलोपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात आली होती, पण विदर्भात झालेल्या नुकसानीमुळे ही उत्पादकता बरीच खाली येण्याची चिन्हे आहेत. एकटय़ा अमरावती जिल्ह्य़ात जून-जुलैच्या पावसाने ३२ टक्के क्षेत्रातील सोयाबीन पिकांची हानी झाल्याचे सरकारी आकडेवारीनुसार दिसते. जिल्ह्य़ात साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे सव्वा लाख हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. उरलेली कसर पावसाने भरून काढल्यामुळे यंदा कमी उत्पादन होण्याचे संकेत आहेत. हीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्य़ांमध्ये आहे. ऑक्टोबरमध्ये चंद्रपूर जिल्ह्य़ात सरासरीच्या ३१९ टक्के पाऊस झाला आहे. बुलढाणा आणि गोंदियावगळता इतर सर्व जिल्ह्य़ांमध्ये २५० ते २८८ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद आहे. यंदा अमेरिकेतील सोयाबीनची परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नसल्याने निर्यातदारांनी मालवाहू जहाजांची संख्या वाढवली आहे.
सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांनाही या संधीचे सोने करता येणार आहे. मात्र, विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही. अमरावतीच्या बाजारात सोयाबीनच्या खरेदीचे दर २२०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल आहेत. सोयाबीनच्या दाण्याचा आकार छोटा असल्याचे सांगून व्यापारी कमी भाव देत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा