मुंबईत मंत्रालयात आज दुपारी झालेल्या बैठकीत महापालिकेच्या शहर बस सेवेसमोर निर्माण झालेल्या जवळपास सर्व अडचणींचे ग्रहण सुटले. १० एप्रिलपासून सेवा बंदची दिलेली नोटीस लगेचच मागे घेत असल्याचे या बैठकीत प्रसन्न पर्पल या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.
एसटी महामंडळाच्या जुन्या शहर बस डेपोची जागा प्रायोगित तत्वावर मनपाला देणे तसेच बेकायदेशीर रिक्षांच्या विरोधात कडक मोहीम सुरू करणे असे दोन्ही सकारात्मक निर्णय या बैठकीत त्या त्या विभागांच्या राज्याच्या प्रमुखांच्या उपस्थितीत झाले, हे या बैठकीचे वैशिष्टय़ आहे. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या पुढाकाराने त्यांच्याच दालनात ही बैठक झाली.
परिवहन मंत्री गुलाबराव देवकर तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर, परिवहन आयुक्त श्री. खाडे तसेच मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, नगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, पोलीस उपअधीक्षक शाम घुगे, प्रसन्न पर्पल कंपनीचे सरव्यवस्थापक रोहीत परदेशी या बैठकीला उपस्थित होते. आयुक्तांनी या सेवेची शहराला असलेली गरज स्पष्ट केली. तर परदेशी यांनी सेवा चालवताना येत असलेल्या अडचणींची माहिती दिली.
अडचणी स्पष्ट झाल्यानंतर लगेचच पाचपुते यांनी महामंडळाच्या जागेबाबतचा विषय काढला. शहर बस सेवेसाठी ही जागा अत्यंत सोयीची आहे. पुर्वी महामंडळाची शहर बस सेवा याच जागेतून चालायची, त्यामुळे ही जागा द्यावी असे त्यांनी सुचवले. त्याला प्राथमिक मान्यता देण्यात आली. तांत्रिक काही अडचणी असतील तर त्या सोडवून प्रायोगिक तत्वावर ही जागा महामंडळ मनपाला देईल असे सांगण्यात आले. मनपाने जागेची मागणी करणारे पत्र महामंडळाला द्यावे असे ठरले.
बेकायदेशीर रिक्षांबाबत परिवहन आयुक्तांनी नगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कांबळे यांना त्वरीत मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांना पोलिसांचे सहकार्य मिळवून द्यावे असे घुगे यांना सांगण्यात आले. त्वरीत ही मोहीम सुरू झाली पाहिजे असे मंत्र्यांनी संबधित अधिकाऱ्यांना बजावले.वाहतूक शाखेचा कारभार सुधारण्याबाबतही सुचना देण्यात आल्या.
दोन्ही गोष्टी सकारात्मक झाल्याने ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी परदेशी यांनीही लगेचच सेवा बंद करत असल्याची नोटीस मागे घेत असल्याचे बैठकीतच जाहीर केले. कंपनीही यापुढे ही सेवा अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक सवलत पास, महिला व युवतींसाठी राखीव आसने, जादा गाडय़ा असे उपक्रम नव्याने सुरू करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
जुन्या स्थानकावर जागा, अवैध रिक्षांवर कारवाई
मुंबईत मंत्रालयात आज दुपारी झालेल्या बैठकीत महापालिकेच्या शहर बस सेवेसमोर निर्माण झालेल्या जवळपास सर्व अडचणींचे ग्रहण सुटले. १० एप्रिलपासून सेवा बंदची दिलेली नोटीस लगेचच मागे घेत असल्याचे या बैठकीत प्रसन्न पर्पल या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.
First published on: 06-04-2013 at 01:13 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Space to old place action on illegal rickshaw