राज्यातील विविध भागात वाढलेल्या छेडछाड, विनयभंग, बलात्काराच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर मुलींच्या शाळा-महाविद्यालयांपुढे पोलिसांची विशेष सुरक्षा तैनात केली जाणार आहे. यासंदर्भात पोलिस दलाकडून शिक्षण विभागाला शहरातील मुलींच्या शाळा- महाविद्यालयाच्या संख्येबाबत विचारणा करण्यात आली असून त्या दृष्टीने पोलीस विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संतापाचा आगडोंब उसळल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावले  उचलली आहेत. महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थिनींना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने पोलिसांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्याच्या काही भागात दिवसाढवळ्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. मुंबईतील चेतना महाविद्यालयात मित्राने केलेल्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थिनीचा नुकताच झालेला मृत्यू, जळगाव, बीड, चंद्रपूर, वाशीम रत्नागिरी या भागात झालेल्या बलात्काराच्या घटना बघता महिला महाविद्यालये आणि मुलींच्या शाळांपुढे पोलीस तैनात केले जाणार
आहेत.
या संदर्भात शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला महाविद्यालये आणि मुलींच्या शाळांची माहिती मागविण्यात आली असून पोलीस विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. शिक्षण विभागाला तसे आदेश देण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्य़ात मुलींच्या शाळा-महाविद्यालयाची संख्या ६५च्या वर असून विदर्भात जवळपास ३०० च्या जवळपास शाळा-महाविद्यालये आहेत. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात खाजगी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासंदर्भातही राज्य सरकारचे आदेश असताना अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये अशी व्यवस्था नाही. त्यामुळे अशा शाळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
प्रत्येक शाळा महाविद्यालयासमोर किमान एका पोलीस शिपाई सुरक्षेसाठी असावा, अशी मागणी काही सामाजिक आणि शिक्षण संघटनाकडून करण्यात आली तरी आज पोलीस विभागाकडे इतक्या मोठय़ा प्रमाणात पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.       

Story img Loader