जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील मतदान विविध अर्थानी वैशिष्टय़पूर्ण ठरले. शहरी भागातील निरूत्सहाच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात असलेला उत्साह..शहरी भागात शेवटच्या एका तासात लागलेल्या रांगा..लक्ष्मीदर्शनाची चर्चा..पंचरंगी लढतींमुळे एकेका मताला आलेले महत्व असे सर्व प्रकारचे कंगोरे लाभलेल्या मतदानाच्या दिवशी टक्केवारीची सत्तरी पार केलेले मतदारसंघ अधिक चर्चेत राहिले आहेत. जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये अशी किमया झाली असून या मतदारसंघातील निकाल आता कोणता चमत्कार घडवितात हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय पातळीवरून शहरात पथनाटय़, फेरी, सामूहिक शपथ अशा विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. माध्यमांनीही त्यात आपली भूमिका पार पाडली. काही समाजसेवी संस्था आणि संघटनांनीही या अभियानास हातभार लावला. हे सर्व बघता शहरात विक्रमी मतदान होण्याची अपेक्षा बाळगण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात शहरी मतदारांनी सर्वाचीच निराशा केली. दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात निम्म्या मतदारसंघांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. शेती आणि दिवाळीची कामे सुरू असतानाही ग्रामीण भागातील मतदारांनी आधी मतदान करण्यास प्राधान्य दिले. तुलनेत शहरी भागात सरकारी सुटी जाहीर करण्यात आलेली असताना आणि औद्योगिक कंपन्यांनी मतदान करण्यासाठी विशेष सुटी जाहीर केली असतानाही मतदानासाठी नाशिककर मोठय़ा प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसले नाही.
सर्वाधिक ७४.९० टक्के मतदान झालेल्या दिंडोरीत निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मतदारसंघात असे विक्रमी मतदान होण्याचे कारण राजकारण्यांनाही समजेनासे झाले आहे. विशेषत: युवावर्गाने मोठय़ा प्रमाणावर दिलेला प्रतिसाद सर्वानाच चक्रावून सोडणार असून युवावर्गाचे मतदानच निर्णायक ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा युवावर्गास भाजप आणि शिवसेनेने अधिक आकर्षित केले असले तरी या मतदारसंघात भाजपचा उमेदवार कमकुवत असल्याने युवावर्गाने पर्याय म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांपैकी कोणाची निवड केली असेल, याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. मागील निवडणुकीत युती असतानाही शिवसेनेचे धनराज महाले हे अवघ्या ३०० मतांनी निवडून आले होते. यावेळी भाजपची साथ नसताना महाले यांचा विजय झाल्यास तो एक चमत्कार मानला जाईल.
पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या निफाड मतदारसंघात ७३.७३ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाच्या वाढीव टक्केवारीमागे अफाट प्रमाणात मतदारांना करण्यात आलेले ‘लक्ष्मीदर्शन’ हे कारण सांगितले जात आहे. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांपेक्षा येथे राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आणि शिवसेनेचे अनिल कदम यांच्यातच प्रमुख लढत झाली. मतदारसंघात पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथील मतदान सर्वाधिक आहे. त्यात पिंपळगाववर बनकरांचे तर ओझरवर कदमांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. दोन्ही उमेदवारांचा हा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाल्याची चर्चा असल्याने निकालाचे गणित त्यामुळे अधिकच कठीण झाले आहे. मागील निवडणुकीत पिंपळगावनेही कदमांची बऱ्यापैकी पाठराखण केली होती. या दोन्ही बडय़ा गावांची ही स्तिती असल्याने तालुक्यातील इतर गावांमध्ये कोणी किती प्रमाणात मुसंडी मारली असेल आणि वैकुंठ पाटील या भाजप उमेदवाराच्या झोळीत किती प्रमाणात मते जातात, त्यावर येथील विजयाचे गणित अवलंबून आहे.
७२.२१ टक्के मतदानाची नोंद झालेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पक्ष कोणताही असो, विजय निश्चित असे समीकरण रूढ झालेले ज्येष्ठ नेते ए. टी. पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार यावेळी विलक्षण अडचणीत असल्याची चर्चा आहे. कळवण तालुक्यातीलच भाजपचे उमेदवार यशवंत गवळी यांच्यामुळे पवारांची अधिक गोची झाल्याचे मानले जात आहे. गवळी यांना प्रचारादरम्यान मिळालेला पाठिंबा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना चकित करणारा ठरला. गवळी आणि पवार यांच्यात कळवण तालुक्यात होणाऱ्या मतविभागणीचा थेट फायदा सुरगाणा तालुक्यातील माकपचे उमेदवार जीवा पांडु गावित यांना होत असल्याचे दिसते.
आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखले जाणारे आमदार माणिक कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघात ७१.६४ टक्के मतदानाची नोंद झाली. हे मतदान कोकाटे यांच्यासाठी धडकी भरविणारे असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपची उमेदवारी घेणारे कोकाटे यांची लढत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याशी झाली. कोकाटे यांनीही शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता. परंतु तो यशस्वी न झाल्याने अखेर ते भाजपचे उमेदवार झाले. स्वत:ची हक्कीची अशी काही मते आणि मोदी लाटेवर कोकाटे हे तरून जातील असा समर्थकांचा दावा असला तरी राष्ट्रवादीतील अनेकांसह तालुक्यातील जवळपास सर्वच कोकाटे विरोधकांनी वाजे यांना केलेली मदत लपून राहिलेली नाही. त्यातच पंकजा मुंडे यांची सभा अचानक रद्द झाल्याने वंजारी समाजात योग्य तो संदेश गेल्याची चर्चा आहे.
चांदवड-देवळा मतदारसंघात ७१.५८ टक्के मतदान झाले असून हे वाढीव मतदान भाजपचे डॉ. राहुल आहेर यांच्यासाठी फायदेशीर असल्याचे दिसत आहे. प्रचारात प्रारंभी काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल हे सहज बाजी मारतील असे चित्र होते. परंतु राष्ट्रवादीचे उत्तम भालेराव, अपक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनीही प्रचारात रंग भरल्याने कोतवाल यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. कोतवाल, भालेराव आणि कुंभार्डे यांच्यात होणारी चांदवडची मतविभागणी देवळ्याचे डॉ. आहेर यांच्या पथ्थ्यावर पडू शकते.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या येवला मतदारसंघात ७०.६६ टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना शिवसेनेचे संभाजी पवार यांच्याकडून कडवी झूंज देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
भुजबळ यांनी पध्दतशीरपणे राजकीय रिगणातील आपले एकेक उमेदवार कमी करून ते आपल्या पाठीशी राहतील याची काळजी घेतली. त्याचवेळी पवार हे एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु राजकारण कोळून प्यालेले अनुभवी काका मारोतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी पवार यांनी सूत्रबध्दपणे केलेला प्रचार आणि मतदारसंघात सर्वदूर पसरलेले त्यांचे नात्यागोत्यांचे जाळे ही पवार यांची जमेची बाजू मानली जात आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काही जणांना झालेले लक्ष्मीदर्शन आणि काही जणांना ते न झाल्याने व्यक्त होणारी नाराजी, याचा फटका कोणाला बसेल हे सांगणे अवघड झाले आहे.
टक्केवारीची सत्तरी, कोणती किमया करी ?
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील मतदान विविध अर्थानी वैशिष्टय़पूर्ण ठरले. शहरी भागातील निरूत्सहाच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात असलेला उत्साह..
First published on: 18-10-2014 at 02:00 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special attention to six seats in nashik district