दोन दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारात कलाकुसरीने नटलेल्या आकर्षक राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. या राख्यांची निर्मिती अनेक संस्थांकडून करण्यात येत असून अपंगत्वावर तसेच गतिमंदत्वावर मात करीत विशेष मुलेही या राख्या तयार करण्यात गुंतून गेली आहेत. विविध प्रकारचे साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या विविधरंगी सुंदर अशा राख्यांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. ऐरोली येथील पॅरपोलॉजिक संस्थेचे संजीवन दीप विद्यालयातील मुले रक्षाबंधनासाठी राखी व घर सजवण्यासाठी शोभेच्या वस्तू आदी साहित्य १५ वर्षांपासून तयार करीत आहेत. यामध्ये गोंडय़ाची राखी, मनीची राखी, प्रेझेंट पाकीट, तोरण आदी वस्तू बनवण्यात ही विशेष मुले सध्या मग्न आहेत. ही मुले स्वावलंबी बनावीत तसेच त्याच्या बुद्धिमतेचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष मुलांनी तयार केलेल्या या राख्या राधिकाबाई मेघे विद्यालय, सरस्वती विद्यालय, जे.व्ही.एम. मेहता महाविद्यालय या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या आकर्षक राख्या वाखाणण्याजोग्या आहेत. या वस्तू बनविण्यासाठी येथील शिक्षक मुलांना मदत करीत आहेत. १८ ते २० मुले हे काम करीत असून शाळेतील इतर विद्यार्थीदेखील या कामात त्यांना मदत करीत आहेत. विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांना यामध्ये सामील करून घेतले जाते.  विशेष मुलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यातून मिळणारे उत्पन्न हे त्या मुलांना दिले जाते. विशेष मुलांना यातून भविष्यात रोजगाराची संधी निर्माण होते, असे पाटील यांनी सांगितले. या विशेष मुलांनी बनविलेल्या राख्या हव्या असल्यास त्यांनी संजीवन दीपच्या प्रशासकीय अधिकारी
तनुजा पाटील-  ९२२३५४९०४३  यांच्याशी संपर्क साधवा.