स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात नवे तीन उपविभागीय अधिकारी कार्यालये सुरू होत असून, प्रांताधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही झाल्या आहेत. पाटणच्या प्रांताधिकारीपदी दादासाहेब जोशी, माण विभागासाठी प्रमोद गायकवाड, तर कोरेगाव उपविभागीय कार्यालयाचे प्रांत म्हणून रवींद्र कुलकर्णी पदभार स्वीकारतील. कुलकर्णी हे सध्या पुणे येथे विशेष कार्यकारी दंडाधिकारी असून त्यांनी यापूर्वी भूसंपादन अधिकारी म्हणून सातारा येथे काम केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आवश्यकतेनुसार नव्याने उपविभागीय कार्यालयांची निर्मिती करण्यात  आली आहे. या पाश्र्वभूमीवर महसूल विभागात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडत आहे.
रोजगार हमी योजनेची कामे सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवत जिल्ह्याला चौथ्या क्रमांकावर नेणारे श्रीमंत पाटोळे यांची बदली सोलापूरच्या प्रांताधिकारीपदी झाली आहे. सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकरी सोनाप्पा यमगर यांची बदली शिरूर (पुणे) येथे प्रांताधिकारीपदी झाली आहे. त्यांच्या जागी महसूल उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख रूजू होत आहेत. भूसंपादन अधिकारी शिरीष यादव यांची बदली महसूल उपजिल्हाधिकारीपदी झाली आहे.

Story img Loader