भंडारा-गोंदिया हा शेतकरी, शेतमजुरांचा जिल्हा आहे. दोन्ही जिल्ह्य़ात भाताची शेती मोठय़ा प्रमाणात आहे. भाताची शेती खर्चिक असल्यामुळे आपण मागील वर्षी लाखांदूर येथे साखर कारखाना उभारला. त्यामुळे भंडारा-गोंदिया या जिल्ह्य़ातील ऊस यावर्षी या कारखान्याने गळीत केला. त्यामुळे या भागातील शेतकरी धानाचे पीक सोडून ऊस या नगदी पिकाकडे वळले. गोसेखुर्द धरणाचे काही काम प्रस्तावित असून त्रुटीअभावी थांबविण्यात आले होते. केंद्राकडून या धरणाला विशेष पॅकेज यावर्षी मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले.
आसगाव (चौ.) येथे सभागृहाच्या भूमिपूजनप्रसंगी अलीकडेच ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार होते. अतिथी म्हणून आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल, दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, नरेश डहारे, पंढरीनाथ सावरबांधे, शरद काटेखाये, प्राचार्य सच्चिदानंद फुलेकर, जिल्हा परिषदेचे विजय सावरबांधे, मोहन पंचभाई, शंकर तेलमासरे, युवराज वासनिक, शैलेश मयूर, राजेश डोंगरे, लोमेश वैद्य, पंचायत समिती सदस्य माया भेंडारकर, सरपंच राजेश भेंडारकर, उपसरपंच गोपाल वैरागडे, यादव भोगे, यादव डोये उपस्थित होते.  पटेल म्हणाले की, नॅशनल थर्मल पॉवर कंपनी ही भारत सरकारची कंपनी असून देशातील या कंपन्या नफ्यातून दोन टक्के रक्कम विकास कामासाठी देतात. त्यामधूनच आसगाव येथे सभागृह बांधकामासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी मिळाला आहे. आता कृषीवर आधारित उद्योग उभे करणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना समोर येऊन उद्योगांची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.लाखांदूर येथील साखर कारखान्याची क्षमतासुद्धा आता दुपटीने वाढविली जाणार आहे. हा साखर कारखाना एका वर्षांत निर्माण करून, उत्पादन करणारा पहिला साखर कारखाना ठरला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विलास शृंगारपवार, विलास काटेखाये यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक हिरालाल खोब्रागडे यांनी केले. संचालन डॉ. अनिल धकाते यांनी केले. आभार तालुका अध्यक्ष रेखा भेंडारकर यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा