गोवा राज्य शासनाच्या कला आणि संस्कृती विभागातर्फे येत्या ९ जून रोजी गोव्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेते दिवंगत मा. दत्ताराम यांच्यावरील ‘नाटय़वीर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच मा. दत्ताराम यांच्या जीवनावर आधारित एका छायाचित्रांच्या प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
मा. दत्ताराम यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम दुपारी पावणेचार वाजता  पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रॅगान्झा सभागृहात होणार आहे. ‘नाटय़वीर’ या पुस्तकाचे संपादन डॉ. अजय वैद्य यांनी केले असून पुस्तकाचे प्रकाशन गोव्याचे सहकार मंत्री पांडुरंग ऊर्फ दीपक ढवळीकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास ज्येष्ठ गायक पं. रामदास कामत, अभिनेत्री आशालता वाबगावकर, पद्मश्री प्रसाद सावकार, मोहनदास सुखटणकर, कमलाकर नाडकर्णी, रामकृष्ण नाईक, नारायण उर्फ नाना वळवईकर, कृष्णकांत दळवी, भीकु पै, डॉ. अजय वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी काही नाटय़प्रवेश आणि नाटय़गीते सादर केली जाणार आहेत.

Story img Loader