मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन यासाठी पुणे महापालिकेने प्रत्यक्ष कृती करण्याची योजना आखली असून त्यासाठी एका समितीचीही स्थापन करण्यात येत आहे. मराठीचे शिक्षण, प्रशिक्षण, जतन आणि संशोधन अशा स्वरूपाचे काम या योजनेअंतर्गत चालेल. त्यासाठी मराठी भाषा संवर्धन कार्यालयही महापालिका सुरू करणार आहे.
मराठी भाषा संवर्धन उपक्रमासाठी महापालिकेने चालू वर्षांच्या अंदाजपत्रकात दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्या निधीतून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी मंजुरी मागणारा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत मराठी भाषेचे शिक्षण देणे, विविध माध्यमातून मराठीचे प्रशिक्षण देणे, मराठीचे जतन व संवर्धन करणे आणि मराठी संबंधी संशोधन करणे आदी कामे या योजनेअंतर्गत करणे अपेक्षित आहे. त्यानुसार मराठी भाषा विभागासाठी २५ गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, असे विभागीय आयुक्तांनी महापालिकेला कळवले आहे. त्याच धर्तीवर महापालिकाही मराठी भाषा संवर्धनाचे विविध उपक्रम राबवणार असून त्यासाठी मराठी भाषा सल्लागार समितीची स्थापना महापालिका स्तरावर केली जाणार आहे.
या समितीच्या माध्यमातून मराठी संबंधीचे विविध उपक्रम राबविले जातील. त्यात प्रामुख्याने संगणकावर मराठी टंकलेखनाचे प्रशिक्षण देणे, अमराठी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी वर्ग सुरू करणे, मराठीचे संवर्धन व मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद यांचे आयोजन करणे, कार्यालयीन कामकाजात मराठीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृती योजना राबवणे, मराठी भाषा भवन उभारून त्यात मराठी शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन वगैरे विषयांची दालने उभारणे आणि मराठी साहित्य तसेच मराठी शब्दकोश तयार करणे असे उपक्रम, कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी तज्ज्ञांची तसेच मराठी भाषा संवर्धन या विषयात काम करणाऱ्यांची समिती स्थापन करावी अशी सूचना सभागृहनेता सुभाष जगताप यांनी केली होती. त्यानुसार ९ नोव्हेंबर रोजी एक समिती गठित करण्यात आली असून समितीमध्ये अकरा सदस्य आहेत.
अकरा सदस्यीय समिती
महापालिका आयुक्त हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, तसेच महापालिकेचे सल्लागार (कामगार) हे सदस्य सचिव असतील. साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, पुणे विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. विद्यागौरी टिळक, समर्थ मराठी संस्थेचे अध्यक्ष अनिल गोरे, पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे
प्रमुख हरि नरके, मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य सुधीर नारखेडे, मराठी
भाषा प्रचारक श्याम भुर्के, संजय भगत, अभ्यागत म्हणून प्रदीप निफाडकर आणि मराठी विश्वकोष मंडळाचे संपादक यांची या समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.विश्रामबागवाडय़ाजवळ महापालिकेची झाशीची राणी शाळा क्र. ४ ही मुलींची शाळा असून या शाळेच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये मराठी भाषा संवर्धन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

दृष्टिक्षेपात महापालिकेची योजना
* मराठीचे जतन, संवर्धन करणार
* मराठीचे प्रशिक्षण देण्याची योजना
* मराठी भाषा भवनाची उभारणी
* अकरा जणांची समिती स्थापन
* विश्रामबागवाडय़ाजवळ कार्यालय