मुका-बहिरा नायक आणि ऑटिस्टिक नायिका यांची गोष्ट सांगणारा अगदी अलीकडचा गाजलेला ‘बर्फी’ असो की मुक्या-बहिऱ्या जोडप्याचे सहजीवन दाखविणारा ‘कोशिश’ असो किंवा राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेता ‘श्वास’ असो विविध विकार तसेच अपंगत्व, आजार याविषयी जनमानसामध्ये प्रभावी पद्धतीने जनजागृती चित्रपटांद्वारे होते. डिस्लेक्सिया या आजाराबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती. परंतु, अमोल गुप्ते-आमिर खान-दर्शिल सफारी यांच्या गाजलेल्या ‘तारे जमीं पर’मुळे असा काही आजार असतो आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकतो याची जाणीव लोकांना झाली. प्रियांका चोप्राने अप्रतिम साकारलेल्या ‘झिलमिल’ या बर्फीमधील व्यक्तिरेखेदरे ऑटिझमविषयक माहिती लोकांना प्रभावी पद्धतीने मिळाली. आता स्वमग्नता या विषयावर शेखर सरतांडेल यांनी ‘माय डिअर यश’ हा चित्रपट दिग्दर्शित केला असून त्याचा विशेष विनामूल्य खेळ मंगळवारी वर्ल्ड ऑटिझम डेनिमित्त रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील मिनी थिएटरमध्ये संध्याकाळी ६.३० वाजता दाखविण्यात येणार आहे.
२ एप्रिल हा जागतिक ‘स्वमग्नता दिन’ (वर्ल्ड ऑटिझम डे) म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ सालापासून हा दिवस जाहीर केला आहे. ऑटिझम किंवा स्वमग्नता म्हणजे स्वत:तच रमून राहण्याची तीव्र स्वाभाविक वृत्ती. विशेषत: लहान मुलांमध्ये वाढत्या वयात दिसून येणारी ही वृत्ती म्हणजे आजार नसून कमीअधिक प्रमाणात त्रास देणारी समस्या ठरते. या समस्येची जाणीव पालकांना करून देण्यासाठी चित्रपट या उत्तम माध्यमाचा उपयोग दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी ‘माय डिअर यश’ हा चित्रपट तयार केला आहे. अथर्व बेडेकर या बालकलाकाराने यात मुख्य भूमिका साकारली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ‘माय डिअर यश’च्या विशेष खेळाचे आयोजन केले असून या वेळी या चित्रपटातील लोकेश गुप्ते, सुखदा यश, प्रदीप वेलणकर, विभव बोरकर, उमेश कामत तसेच डॉ. अच्युत गोडबोले आदी उपस्थित राहणार आहेत. चित्रपटाबरोबरच स्वमग्नता या विषयावर चर्चा केली जाणार आहे.