लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, कोणीही वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणारे नाही. पूर्वी अशाच ‘गमती-जमती’ केल्यामुळे राज्याची सत्ता हातातून गेली होती, याची जाणीव ठेवली ठेवली पाहिजे, असा कानमंत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी येथे दिला.
पत्रकारांशी बोलताना डॉ. कदम म्हणाले, की लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढविण्याचा निर्णय झाला आहे. हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला हवी आहे. राज्यात कुठे तरी जागांची अदलाबदल शक्य आहे. जालना लोकसभेची जागा काँग्रेसची असून ती राष्ट्रवादीस सोडण्याचे अजून ठरले नाही. जागांच्या अदलाबदलीची चर्चा समन्वय समितीत झाल्यानंतर त्याबाबत अंतिम निर्णय दिल्लीत होईल. कोणत्या पक्षाकडे चांगला उमेदवार आहे, त्यावरच हा निर्णय अवलंबून असेल. आपण लोकसभेची नव्हे, तर विधानसभेचीच निवडणूक लढविणार असून ती अंतिम असेल असेही कदम यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदावर आरूढ होण्याच्या शक्यतेबाबत प्रश्न विचारला असता, ‘एवढे दिवस सरकारमध्ये राहिल्यावर त्या आणि या पदात काय फरक असतो?’ असा प्रतिप्रश्न कदम यांनी केला.
राज्यात वाघांची संख्या कोणत्या भागात वाढली? या प्रश्नावर कदम उत्तरले, की विदर्भात ही संख्या वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात म्हणाल तर दोन पायांच्या वाघांचीच संख्या अधिक आहे! राज्यातील विविध महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या का रखडल्या हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारलेला बरा, असे सांगून ते म्हणाले, की या संदर्भात मुख्यमंत्र्यांची व आपली चर्चा झाली नाही. राज्यात गेल्या वर्षीच्या दुष्काळावर चार हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगून ते म्हणाले, की त्यामुळे पुनर्वसनाची काही कामे रखडली असली, तरी त्यासाठी आता ५०० कोटी देण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम एक हजार कोटींपर्यंत वाढविणार असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असलेल्या प्रचाराच्या पाश्र्वभूमीवर कदम यांनी केंद्रात सत्ताबदलाची शक्यता नसल्याचा दावा केला. दक्षिणेतील कोणताही पक्ष त्यांच्यासोबत जाणार नाही. नीतिशकुमार, मुलायम, मायावती, ममता बॅनजी हे नेतेही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. सध्या असलेल्या आरक्षणात ढवळाढवळ न करता मराठा समाजास आरक्षण द्यावे, असेही कदम यांनी सांगितले.
‘नगर-नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्र’!
जायकवाडीत नगर-नाशिक जिल्हय़ांतील धरणांतून पाणी सोडण्यास तेथील मंडळींचा विरोध आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मंडळींकडून होणारा विरोध अयोग्य आहे, असे निदर्शनास आणून प्रतिक्रिया विचारली असता कदम म्हणाले, की नगर व नाशिक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र नव्हे, तर तो उत्तर महाराष्ट्र आहे! परंतु पूर्वीसारखा १४ जिल्हय़ांचा विचार करून त्यास पश्चिम महाराष्ट्र म्हटले तर तो फार मोठा भाग होईल. पाणी हे सर्वाचेच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो, असे सांगून या संदर्भात अधिक व्यक्तव्य करणे कदम यांनी टाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा