यवतमाळ पोटनिवडणुकीचा बिगुल वाजताच विदर्भातील राजकीय हालचालींना वेग आला असून मतदारसंघातील अस्तित्व दाखवून देण्यासाठी राजकीय नेत्यांची लॉबी सक्रिय झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सव्वा वर्षे वेळ असला तरी आतापासून राजकीय ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली असून यात आता राष्ट्रीय व राज्य पातळीवरील दिग्गज नेत्यांनी उडी घेतली आहे.
भंडाऱ्यातील भेलच्या पॉवर फॅब्रिकेशन प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी राजकीय शक्तिप्रदर्शनाची नामी संधी ‘कॅश’ केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी विदर्भाचे औद्योगिक चित्र बदलविण्यात राष्ट्रवादीचे मोठे योगदान असल्याचे भासविण्याची चालून आलेली संधी सोडली नाही. याचदरम्यान केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भंडाऱ्यातील भेलच्या पायाभरणी कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्य़ात फळबागा आणि मत्सप्रक्रिया उद्योग उभारणी करण्याचे सूतोवाच करून औद्योगिक विकासाला चालना देण्यात राष्ट्रवादीचे घोडे पुढे दामटले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भंडारा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या तीन दशकांपासून रेंगाळलेल्या वादग्रस्त गोसीखुर्द प्रकल्पाचा  आकस्मिक दौरा केला. सिंचन घोटाळ्याचे सावट आलेल्या आघाडी सरकारला सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी ११९७.०७ कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर करून विदर्भातील प्रकल्पग्रस्तांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.
यवतमाळात दिवं. आमदार नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकरांना उमेदवारी देऊन सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याच्या दिशेने काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे तर मदन येरावार या पराभूत उमेदवाराला पुन्हा एकवार तिकीट देत भाजपने यवतमाळातील मतदारांच्या कौलाची चाचपणी सुरू केली आहे. नागपुरात नितीन गडकरी लोकसभेसाठी उभे राहणार असल्याने महापालिकेच्या विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपने विकासाच्या मुद्दय़ावर लोकांना आकर्षित करणे सुरू केले आहे.
नागपुरातही मोर्चेबांधणी सुरू झाली असून कुरघोडीच्या राजकारणाचे रणशिंग फुंकताना भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत लेआऊट्सच्या बजबजपुरीसाठी काँग्रेसला जबाबदार ठरवून पुढील प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांना अडचणीत आणण्याची एकही संधी भाजप आता सोडणार नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे. नागपूरच्या खासदार निधीपैकी ७० टक्के निधी खर्च होत नसल्याची ओरड करून मुत्तेमवारांची निष्क्रियता चव्हाटय़ावर आणण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांनीही सोडलेली नाही. परंतु, निवडणूक जवळ असल्याने अंतिम वर्षांच्या टप्प्यातून जाणाऱ्या विलास मुत्तेमवारांनी नागपुरातील कॅन्सर हॉस्पिटल, गोसीखुर्दला होणारा विलंब, शेतकरी आत्महत्यांसाठी ५ हजार कोटींच्या पॅकेजची मागणी, मिहानचे बांधकाम पूर्ण करण्याची हाक आणि नागपूरला पर्यायी राजधानी करण्याच्या मुद्दय़ावर लोकसभेत आवाज उठवून भाजपला शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे. विलास मुत्तेमवार मुरलेले राजकारणी असल्याने शेवटच्या टप्प्यातील त्यांच्या चाली ओळखून भाजपला वाटचाल करावी लागणार आहे. गडकरींना नागपुरातून जिंकून लोकसभेत प्रवेशण्याचे वेध लागले असून त्यांचा सर्वाधिक भर विकास कामे आणि शेतकऱ्यांची मते खेचण्यावर राहील, असेच दिसून येत आहे.