चैत्र पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. सासनकाठी, गज, अश्व, मानकऱ्यांचा लवाजमा असे वैशिष्ट असणारी ही यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत पार पडत असते. या निमित्त यात्रेकरूंची सोय, मोफत अन्नछत्र, वैद्यकीय सेवा, एस. टी. वाहतूक, पार्किंग सुविधा अशी सर्वप्रकारची यंत्रणा गतीमान झाली आहे.
लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने खास यात्रेसाठी १५० गाडय़ांची व्यवस्था केली आहे. ५ मिनिटाला एक गाडी सुटणार आहे. जोतिबा डोंगर, पंचगंगा नदी घाट येथे तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत.     
यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राची सोय विविध संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. गायमुख येथे सहजसेवा ट्रस्ट, शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने पंचगंगा घाट, आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जोतिबा यात्रास्थळी अन्नछत्र भरविले आहे. या शिवाय जीवन मुक्ती संघटनेच्या वतीने सहा बेड, औषधोपचार, रुग्णवाहिका यासह ५० डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यात्राकाळात वाहतुकीचा गोंधळ होऊ नये यासाठी चार वेगवेगळ्या पध्दतीने  पार्किंगची सोय प्रशासनाने केली आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या अंतर्गत पंचगंगा घाट येथे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, महिलांसाठी कपडे बदलण्याची स्वतंत्र व्यवस्था तसेच वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना माहिती देण्यासाठी पंचगंगा नदी घाट व भवानी मंडप येथे मदत व माहिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या महिती केंद्राचा शुभारंभ उद्या मंगळवारी महापौर जयश्री सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. भवानी मंडप येथील माहिती केंद्रामध्ये भाविकांसाठी माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे. पंचगंगा घाट येथे महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात येणार आहेत. महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने पंचगंगा घाटाची साफसफाई करण्यात आली असून यात्रा काळात स्वच्छेतेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही ठेवण्यात येणार आहे. स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी आज पंचगंगा घाट येथे भेट देऊन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा