जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुथ्थान योजनेतंर्गत शहरातील विविध भागात सुरू असलेल्या घरकुल योजनेतंर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या माध्यमातून तीन हजार घरे शहरातील विविध भागात बांधण्यात येणार असून त्यापैकी काही १५०० चे घराचे काम सुरू झाले असल्याची माहिती गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समितीचे सभापती जगदीश ग्वालबंशी यांनी दिली.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पांढराबोडी आणि झिंगाबाई टाकळी परिसरात बांधण्यात येत असलेल्या घरकुल योजनेचा आढावा घेतला. यावेळी ग्वालबंशी म्हणाले, शहरामध्ये पांढराबोडी, झिंगाबाई टाकळी, वांजरा, पाचझोपडा, आदिवासी गोंडटोळी, इंदिरामाता नगर इत्यादी १५ पेक्षा अधिक वस्त्यांमध्ये घरकुल योजना राबविली जात आहे. पांढराबोडी परिसरात सुरू असलेल्या घरकुल योजनेसंबधी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी एकूण ४५ घराचे बांधकाम करण्यात येत असून त्यापैकी ४४ घरे पूर्ण झाली आहे. एका घराचे काम प्रगतीपथावर आहे. यात प्रत्येक परिवाराला एस हॉल, बेडरुम, स्वयंपाक घर व स्वच्छता घर बांधून देण्यात येत आहे. या बांधकामाचे चटई क्षेत्र ३२५ चौरस फूट आहे. एका घरकुलाच्या बांधकामाची किंमत ५ लाख ६ हजार रुपये असून लाभधारकाला केवळ ९ टक्के रक्कम भरून घरकुलाची मालकी प्राप्त होणार आहे, असेही ग्वालबंशी यांनी सांगितले. उर्वरित ५० टक्के केंद्र शासन, ३० टक्के राज्य शासन आणि ११ टक्के वाटा महापालिका उचलणार आहे. झिंगाबाई टाकळी या परिसरात घरकुलाची पाहणी केली. या ठिकाणी चार मजली इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी १०० गाळे तयार करण्यात येत आहे. वस्तीतील झोपडपट्टी धारकांना गाळे देण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्र त्यांच्याकडून घेतली जाणार आहे. या कामाची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची राहील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश महापौर अनिल सोले यांनी दिले आहे. शिवाय इमारतीमध्ये पिण्याचे पाणी, वीज जोडणी, रस्ते सिव्हर लाईन, स्टॉमवॉटर ड्रेन इत्यादी सुविधा गाळे धारकांना देण्यात येणार आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंत ही योजना पूर्णत्वास यावी या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ग्वालबंशी यांनी सांगितले. यावेळी सुनील अग्रवाल, सुधाकर कोहळे उपस्थित होते.

Story img Loader