गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाच्या निषेधार्थ कसबा बावडा बंदला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तर काल रात्री झालेल्या सभेत आरोप करणाऱ्यांचा निषेध नोंदविण्यात आला. मंगळवारी काँग्रेसच्या नऊ तालुकाध्यक्षांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थनार्थ पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
अशोक पाटील यांच्या खुनानंतर मंत्री सतेज पाटील व भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उभय गटाच्या समर्थकांनी आपल्या नेत्याची बाजू मांडण्यासाठी पुढे येण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच रविवारी रात्री कसबा बावडा येथे शाहू विद्यामंदिराच्या पटांगणात सभा झाली. त्यामध्ये महाडिक यांचे नाव न घेता जोरदार टीका करण्यात आली. समाज भडकविण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप करण्यात आला. सभेत अ‍ॅड. प्रल्हाद लाड, विश्वास नेजदार, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, रूपाली पवार आदींची भाषणे झाली.     सभेत ठरल्यानुसार सोमवारी कसबा बावडा या उपनगरात बंदचे आयोजन केले होते. कसबा बावडा हे सतेज पाटील यांचे गाव आहे. पाटील यांच्या समर्थनासाठी गावकऱ्यांनीही पुढे येत बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उपनगरातील सर्व व्यवहार आज ठप्प झाले होते. सर्वत्र बंदसदृश परिस्थिती जाणवत होती. कसबा बावडय़ाच्या मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आलेला एक फलक लक्षवेधी ठरला होता. वाळलेल्या झाडावर बसून कावळय़ाची काव काव सुरू असल्याचे त्यावर दाखविण्यात आले होते. हा कावळा विकासकामे करणाऱ्या सतेज पाटलांवर घाण टाकत आहे, असे त्यात दर्शविण्यात आले होते. युवानेतृत्वावर बरळणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांचा निषेध असा मजकूर त्यावर लिहिला होता.    दरम्यान काँग्रेसच्या नऊ तालुकाध्यक्षांनी सतेज पाटील यांचे समर्थन केले आहे. बजरंग पाटील (गगनबावडा), दत्ताजी घाटगे (कागल), जयसिंह हिरडीकर (पन्हाळा), सुभाष इनामदार (शाहूवाडी), नामदेव नार्वेकर (आजरा), जी. एन. पाटील-गिजवणेकर (गडहिंग्लज), नामदेव दळवी (चंदगड), प्रसाद खोबरे (हातकणंगले) व अनिल यादव (शिरोळ) या तालुकाध्यक्षांची पत्रावर सही आहे. पत्रकात म्हटले आहे, की काँग्रेस पक्षामध्ये मंत्रिपद देताना नैतिकता व चारित्र्याचा विचार केला जातो. या निकषात उतरत असल्यामुळे सतेज पाटील यांच्याकडे तीन खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. अशोक पाटील खूनप्रकरणाशी संबंध नसतानाही मंत्री पाटील यांना यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी तो यशस्वी होणार नाही. काँग्रेस पक्ष पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यांना बदनाम करण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही.