बोधगया बॉम्बस्फोट घटनेचे पडसाद जिल्हय़ात दुसऱ्या दिवशीही उमटले. आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणीची बाजारपेठ व मोंढा बंद होता. सकाळी नऊपासून सहा तास बसवाहतूक बंद ठेवल्याने प्रवासी अडकून पडले. ‘बंद’ शांततेत पार पडला.
शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रस्ता, वसमत रस्ता, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रस्ता, कच्छी बाजार, बसस्थानक परिसर भागातील दुकाने सकाळपासून, तसेच नवा मोंढय़ातील दुकाने बंद होती. शाळा व महाविद्यालये सकाळी सोडून देण्यात आली. ‘बंद’ काळात बहुतांश औषधी दुकाने बंद असल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना औषधासाठी यातायात करावी लागली. सकाळी सर्व आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. विजय वाकोडे, भीमराव हत्तीअंबिरे, बी. एच. सहजराव, डी. एन. दाभाडे, अतुल सरोदे, बापूराव वाघमारे, संजय देशमुख, नागेश सोनपसारे, रवि सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. आंबेडकर पुतळय़ाजवळ ठिय्या दिल्याने बसस्थानक ते शिवाजी पुतळा रस्त्यावरील वाहतूक बंद होती. या वेळी मोठा बंदोबस्त तैनात होता. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांना निवेदन देण्यात आले.
बसवाहतूक ठप्प
‘बंद’मुळे एस. टी. महामंडळाने सकाळी नऊपासूनच प्रवासीसेवा बंद ठेवली. बीडहून परभणीकडे येणाऱ्या गाडय़ा पाथरीत थांबविण्यात आल्या. औरंगाबादहून येणाऱ्या गाडय़ा जिंतूरला थांबविल्या. परळी, िहगोली, वसमतहून एकही बस परभणीकडे आली नाही. सकाळी नांदेड, िहगोलीकडे जाणाऱ्या बस परभणीत थांबविल्या. दुपारी तीनपर्यंत बससेवा बंद होती. त्यामुळे बाहेरगावी जाणारे प्रवासी अडकून पडले. दुपारनंतर वातावरण निवळले व तीनच्या सुमारास बस सोडण्यात आल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा