सीएसी ऑलराउंडर या साहसी उपक्रम चालविणाऱ्या संस्थेने नागपूर व परिसरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी हिमालयीन ट्रेकिंग शिबिराचे आयोजन केले होते. मनालीच्या थंड प्रदेशात जाऊन मुलांनी साहसी उपक्रमाचा आनंद घेतला. या परिसरात आयोजित विविध चमूमध्ये एकूण १३६ मुले सहभागी होती.
नागपूर रेल्वे स्थानकावरून शिबिराची सुरुवात झाली. मनाली गाठल्यानंतर त्यांनी तेथील निसर्ग बघून शिबिरार्थी प्रफुल्लीत झाले. यावेळी त्यांनी अॅक्लमआयझेशन वॉक करताना तेथील हिडिम्बा मंदीर व मनू मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या खऱ्या ट्रेकिंगची सुरुवात झाली. सोलंग व्हॅलीमध्ये मुलांनी पहिला मुक्काम केला.
बियास नदीच्या काठावर तो ट्रेक होता. त्यांनी स्वत:च तंबू लावून घेतले. दुसऱ्या दिवशीचा मुक्काम धुंदीमध्ये स्नो लाईनला लागून होता. ट्रेकिंगदरम्यान मुलांनी स्नो क्राफ्ट, स्नो ट्रेकिंग करताना घ्यावयाची काळजी, आईस अॅक्सचा उपयोग या सर्व बाबी समजावून घेतल्या. त्यानंतर त्यांनी बर्फामधील खेळ, स्नो मॅन, बर्फाचे गोळे बनविण्याचा आनंद घेतला.
ट्रेकिंगदरम्यान शिबिरार्थीना हनुमान तिब्बा, क्षितीधर, लदाखी आदी पर्वतरांगांचे दर्शन शिबिरार्थीना झाले. ट्रेक पूर्ण केल्यावर शिबिरार्थी मनालीला परत आले. मनालीमधील वशिष्ठ कुंड हे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. या गरम पाण्यात शिबिरार्थीनी आंघोळी केल्या. ट्रेकिंगव्यतिरिक्त मुलांनी शिबिरात व्हाईट वॉटर राफ्टींग, रॅपलिंग, रॉक क्लायबिंग, फन गेम्स, कॅम्प फायर यासारख्या अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज केल्या. साहसी उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कार्यक्षमता, एकाग्रता, खेळांच्या माध्यमातून मानसिक ताण कमी करणे हा या शिबिरामागील उद्देश होता.
हिमालयीन ट्रेकिंग शिबीर यशस्वीरित्या झाल्यानंतर याचप्रकारचे हिमालयीन अॅक्टिव्हिटी आणि ट्रेकिंग, लेह लद्दाख जीप सफारी, बाईक ट्रीपचे शिबीर येत्या जुलै व ऑगस्टमध्ये आयोजित केले आहे. तरीही इच्छुकांनी शिबिरात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी सीएसी ऑलराउंडर, विष्णूजी की रसोई परिसर, बजाजनगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सीएसी ऑलराउंडरच्या हिमालयीन ट्रेकिंग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सीएसी ऑलराउंडर या साहसी उपक्रम चालविणाऱ्या संस्थेने नागपूर व परिसरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी हिमालयीन ट्रेकिंग शिबिराचे आयोजन केले होते.
First published on: 27-06-2014 at 07:33 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spontaneous response to csc himalayan trekking camp