नाशिक विभागस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धाचे यजमानपद या वर्षी नंदुरबार जिल्ह्य़ाकडे असल्याने बहुसांस्कृतिक नंदुरबार जिल्ह्य़ाचे दर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून घडविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी दिल्या आहेत.
दोन व तीन फेब्रुवारी रोजी येथे होणाऱ्या महसूल विभागीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, अशोक वायचळ, साहाय्यक जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सुमन रावत, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे, जिल्हा माहिती व तंत्रज्ञान अधिकारी संजय कोतकर आदी उपस्थित होते. सुमारे ५०० खेळाडूंच्या निवास, भोजनाची व्यवस्था तसेच अत्यावश्यक सर्व सेवा-सुविधांचा आढावा घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली. या क्रीडा स्पर्धाबरोबरच रोज सायंकाळी सांस्कृतिक स्पर्धा शिवाजी नाटय़ मंदिरात आयोजित करण्यात येणार आहेत. विभागीय महसूल क्रीडा स्पर्धाची व्यापकता लक्षात घेऊन स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात येणार असून या समित्यांमध्ये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्य़ात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार असून या दिवशी नवीन मतदारांना मतदानविषयक प्रतिज्ञा देणे, बिल्ला देणे, मतदार ओळखपत्र वाटप, मतदार जागृती करणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. दर वर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु या वर्षी २५ जानेवारीला ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये युवक व महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी जिल्हास्तरावरील विविध विभाग प्रमुखांचे समन्वय गट तयार करण्यात आले आहेत.
जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रम शिवाजी नाटय़मंदिरात होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्य़ातील पाच केंद्रांमधून प्रत्येकी २० नवीन मतदारांना ओळखपत्र, बिल्ले, प्रदान करून प्रतिज्ञा दिली जाणार आहे.
विविध प्रकारच्या स्पर्धा, सांस्कृतिक व भजनी मंडळ, बचत गट यांच्या मदतीने जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रकाश थवील यांनी दिली आहे.

Story img Loader