डोंबिवलीतील टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने १ ते ४ मेदरम्यान सावित्रीबाई फुले नाटय़गृहात आयोजित वसंतोत्सवात सुरेल संगीत मैफलींची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.  उद्घाटन गुरुवारी आनंदवन येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर संध्याकाळी ४.३० वाजता ज्येष्ठ कवी, गीतकार सुधीर मोघे यांना श्रद्धांजली वाहणारी ‘झाले मोकळे आकाश’ ही संगीतकार कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विशेष मैफल सादर होईल. हृषीकेश रानडे, माधुरी करमरकर, सुचित्रा भागवत, अमोल पटवर्धन आणि केतकी भावे-जोशी हे गायक कलावंत त्यात भाग घेणार आहेत. दीप्ती भागवत  सूत्रसंचालन करणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रकट मुलाखतीचा आणि गाण्यांचा ‘सप्तसूर माझे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्मिता गवाणकर  त्यांच्याशी संवाद साधणार असून हृषीकेश रानडे, अनिरुद्ध जोशी, माधुरी करमरकर आणि कल्याणी पांडे गाणी सादर करणार आहेत.
शुक्रवार, २ मे रोजी रात्री साडेआठ वाजता सुप्रसिद्ध बासरीवादक अमर ओक त्यांचा ‘कुंदनलाल सेहगल ते ए. आर. रहेमान’  कालखंडातील गाण्यांमधील बासरीचा प्रवास उलगडून दाखविणारा ‘गोल्डन फ्लूट’ हा नवा कार्यक्रम सादर करणार आहेत. मिलिंद कुलकर्णी सूत्रसंचालन करणार आहेत.  वसंतोत्सवाचे शेवटचे पर्व रविवार, ४ मे रोजी असून त्यात अमित दांडेकर आणि शशांक मोहिते यांची संकल्पना असलेला ‘ना भूले ना बिसरे गीत’ या मैफलीने होणार आहे. या कार्यक्रमात एस.डी आणि आर.डी या पितापुत्र संगीतकारांची अजरामर गाणी स्वप्निल गोडबोले, अमित दांडेकर, हृषीकेश पाटील, शशांक मोहिते, प्रीती निमकर आणि केतकी भावे-जोशी सादर करणार असून कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र करतील.

Story img Loader