रात्री, अपरात्री अगदी केव्हाही त्याचा फोन खणखणतो. तिकडून कोणी तरी सांगत असते, ‘रेल्वेतून कोणीतरी माणुस पडलाय..त्याचे दोन्ही पाय कट झालेत.. दवाखान्यात न्यायचं.. पटकन या..’ आणि मग तो तत्काळ कोणी फोन केला, रात्रीचे किती वाजले, त्या व्यक्तीशी आपला काय संबंध, या प्रश्नांच्या जंजाळात न पडता धावपळ करीत घटनास्थळी पोहोचतो. रक्ताच्या थारोळ्यातल्या त्या अनोळखी व्यक्तीला मायेने उचलून जमेल त्या पध्दतीने उपजिल्हा रुग्णालयात आणतो. त्या व्यक्तीला वाचविण्याची जीवापाड धडपड करतो. अगदी सख्या नातलगासारखा त्या ‘अनाहूत’ व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहतो. जिथे घरचेही हात लावायला धजावत नाहीत, तिथे हा जमेल त्या पद्धतीने जखमींच्या जखमाही पुसतो..आपुलकीची फुंकर घालतो.. आधाराचा हात देतो.. जीव वाचलाच तर एखादी मोठी लढाई जिंकल्याच्या आविर्भावात आनंदोत्सव साजरा करतो आणि दुर्देवाने ती व्यक्ती दगावलीच तर पराभूत योद्ध्यासारखा काही काळ मनातून कोसळतो. अश्रू ढाळतो..आणि पुन्हा नव्याने त्या मृताच्या अंत्यविधीच्या कार्यासाठी सज्ज होतो.. माणूसपणाचे व सामाजिक जाणीवेचे त्याचे हे स्वयंसेवी केंद्र मनमाड शहरात अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. संवेदना हरवत चाललेल्या आजच्या या काळात बेवारसांसाठी, अडल्या नडल्यांसाठी मायेचे, प्रेमाचे छत्र घेऊन समर्थपणे उभा राहिलेला हा हाडाचा कार्यकर्ता म्हणजे विलास उर्फ पिंटू कटारे होय.
आजवर शेकडो बेवारसांना त्याने मरण यातनांतून बाहेर काढले आहे. ज्यांचे कोणी नाही अशा अश्राप, अनाथ मुलांना जिवघेण्या अपघातानंतर केवळ वाचवलेलेच नाही तर जगण्याचेही बळ दिले आहे. त्यांच्यासाठी तो पिंटूमामा नव्हे तर साक्षात देवदूत ठरला आहे. आज रस्त्यावर जखणी अवस्थेत पडलेल्या अनोळखी व्यक्तीला हात लावायला, किंवा त्याची साधी विचारपूस करायला लवकर कोणी तयार होत नसल्याच्या घटना पाहावयास मिळत असताना माणूसकी पेरणाऱ्या विलासचे उदाहरण विरळेच.
अगदी भिकाऱ्यांशीही आत्मीयतेने बोलण्याचा विलासचा स्थायीभाव. त्यातूनच आज तो बेवारसांचा सच्चा साथी बनला आहे. हा साथी अगदी पोलिसांसाठीही मदतगार झाला आहे. मनमाड शहर हे रेल्वेचे मोठे जंक्शन. रेल्वे गाडय़ांसह प्रवाशांचीही इथे मोठी वर्दळ. छोटय़ा-मोठय़ा अपघातांचे प्रमाणही अधिक. अपघात झाला की रेल्वे पोलीस असो की, कोणी अधिकारी. विलास कटारे हेच नाव प्रथम त्यांच्या डोळ्यासमोर येणार. समाजसेवेचे हे चालते बोलते केंद्र सर्वासाठीच तातडीची, अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी एका पायावर तयार. अनेक वर्षांपासून रेल्वे रुळानजिक, परिसरात अथवा इतरत्र पडलेल्या बेवारस मृतदेहांना हातगाडीवर ठेवून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पोहचविण्याचे काम विलास तळमळीने करतो. त्याचे हे नि:स्वार्थ काम पाहून त्याच्या परिसरातील काही तरुण, रेल्वे स्थानकावरची काही मुले त्याला सहकार्य करण्यासाठी तयार झाली आहेत. काही वेळा तर रेल्वे गाडीतून पडलेल्या किंवा दुर्धर आजार असलेल्या जखमींजवळ जाण्यास कोणी तयार होत नाही. दरुगधीमुळे अनेकांना किळस येते पण विलास आपुलकीचा सडा शिंपत त्या व्यक्तीच्या जखमा धुतो. त्यावर आवश्यक ती औषधे फवारून मलमपट्टी करतो. दवाखान्यात नेऊन पुढील उपचारही तातडीने होण्यासाठी धडपडतो. तत्काळ उपचार व्हावे म्हणून डॉक्टरांशी वाद घालतो. एखाद्या जखमीला तत्काळ नाशिक अथवा मालेगावला पुढील उपचारासाठी पाठवायचे असेल तर रुग्णवाहिकेची उपलब्धता करून देतो. डिझेलच्या खर्चासाठी स्वत:च्या खिशाला कातर लावतो. हे सर्व विलक्षण वाटते.
ज्यांच्याकडे अंत्यविधीसाठी पैसे नाहीत अशांना आर्थिक मदतीपासून स्वत:च्या हाताने पार्थिव पुरण्याचेही काम विलास करतो. मिलिंद सामाजिक संस्था विलासने शहरात स्थापन केली आहे. संस्थेच्या माध्यमातून एड्स निर्मूलन जनजागृती मोहीम, वेश्या वस्तीत आरोग्य शिबीर, एड्स झालेल्या पालकांच्या पाल्यांसाठी मदत केंद्र असे उपक्रम त्याने राबवले आहेत. बेवारसांच्या अंत्यसंस्कारासाठी नगर पालिकेने तरतूद करून निधी द्यावा या मागणीसाठी स्मशानभूमीत आमरण उपोषण करणारा विलास वेगळाच. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून विलासने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आमदारांच्या सहकार्याने ‘डिफ्रेझर’ची सुविधा मंजूर करून घेतली आहे. विलासच्या या अनोख्या कार्याबद्दल त्याला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
अनेकांच्या मोबाईलमध्ये अथवा घरच्या फोटोच्या अल्बममध्ये स्वत:ची, नातेवाईकांची छायाचित्रे असतात. पण विलासच्या मोबाईलमध्ये, त्याच्या अल्बममध्ये त्याने मदत केलेल्या बेवारस जखमींची, मृतदेहांची छायाचित्रे आहेत. हे सारं विस्मयकारक. विश्वासाच्या पलिकडचे आहे.

समाजात काही व्यक्ती आपणांकडून शक्य होईल त्याप्रमाणे सामाजिक कार्य करीत असतात. या सर्वाची माहिती समाजापुढे येतेच असे नाही. समाजासाठी अशी दातृत्वाची भूमिका घेणाऱ्या सर्वसामान्यांच्या कार्याची ओळख आजपासून दर मंगळवारी ‘व्यक्ती’ महत्व या सदरातून.

Story img Loader