कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या टोलविरोधातील लढय़ाच्या निर्णायक टप्प्यात ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन व जिल्हाधिकारी राजाराम माने यांना घेराव घालण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हय़ातील बारा तालुक्यांतील जनता व विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकत्रे सहभागी होणार आहेत. अशी माहिती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    ते म्हणाले, की सरकारला संघर्ष सुरूच ठेवायचा आहे, टोलमुळे कोल्हापूरच्या व्यापारावर उद्योगावर परिणाम होणार आहे. शहराच्या भविष्याचा विचार नगरसेवकांनी केला नाही. आयआरबीचीही भूमिका आडमुठी आहे. आयआरबीने कराराचा दुरुपयोग केला आहे. राज्यकर्त्यांना बुद्धी सुचावी व टोल देणार नाही ही भूमिका शासनाला कळवण्यासाठी जिल्हाधिका-यांना दि. ७ रोजी घेराव घालण्यात येणार आहे.
    सत्ताधारी पक्ष सत्याग्रह, आंदोलन या प्रक्रियेतूनच वर आला आहे. ज्या ब्रिटिशांनी देशावर १५० वर्षे राज्य केले त्या ब्रिटिशांनाही गांधीजींशी चर्चा करावी लागली. टोलबाबतही बऱ्याच वर्षांपासून लढा सुरू आहे. आमच्याकडून चच्रेचा मार्ग खुला आहे. त्यामुळे ज्या शिडीने वर आले ती शिडी फेकू नका असा सल्ला प्रा. पाटील यांनी दिला.
    निवास साळोखे म्हणाले, की या आंदोलनात बारा तालुक्यांतील जनता आणि तेथील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकत्रे सहभागी होणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर येथील मुस्लिम बोर्डिगमध्ये लवकरच बठक घेण्यात येणार आहे.
    सतीशचंद्र कांबळे म्हणाले, की टोलविरोधातील आंदोलनाबाबत दिवाळीनंतर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. याबाबत गोविंद पानसरे यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी म्हणून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र पाठविले आहे.