कुख्यात गुंड रवी पुजारीची पत्नी समजून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या श्रीदेवी पुजारी या महिलेची २८ तासांनी सुटका झाली असली तरी झालेल्या मनस्तापामुळे कुटुंबीय अद्याप सावरलेले नाहीत. मंगळूर पोलीस आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वय नव्हता, त्याचा फटका आम्हाला बसल्याची खंत पुजारी कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
 बोरिवलीत राहणारे संतोष पुजारी हे पत्नी श्रीदेवी पुजारी मुलगा आर्यन आणि मुलगी अमेलियासह नाताळच्या सुट्टीसाठी दुबईला निघाले होते. सोमवारी रात्रीच ते मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते. परंतु विमानतळावर त्यांना अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलं. कुख्यात गुंड रवी पुजारीच्या पत्नीचे नाव श्रीदेवी आहे. संतोष पुजारी यांच्या पत्नीचे नावही श्रीदेवी आहे. त्यामुळे ही श्रीदेवी गुंड पत्नी श्रीदेवी असल्याने तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
कारण मंगळूर पोलिसांनी श्रीदेवी पुजारीवर खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करून लुक आऊट नोटीस काढली होती. काही वेळात मुंबई पोलिसांनी तिची खरी ओळख पटली. परंतु मंगळूर पोलीस आम्ही जोपर्यंत येऊन खात्री करत नाहीत तोपर्यंत सोडू नका अशा हट्टाला पेटले होते, असे संतोष पुजारी म्हणाले. जर मंगळूर पोलिसांचा मुंबई पोलिसांवर विश्वास असता तर आम्ही तासाभरातच मोकळे झालो असतो, असेही ते म्हणाले.
.दुबईला जायला मिळेल का?
 दोन महिन्यांपासून त्यांनी या सहलीची नोंदणी केली होती. घरात या सहलीमुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातारवरण होते. सहार पोलीस ठाण्याच्या छोटय़ाशा चौकशी खोलीत वरिष्ठ पोलीस अधिकारी आमची कसून चौकशी करत होते. परंतु मुलगा आर्यन प्रत्येक अधिकाऱ्याला अंकल, आम्हाला दुबईला जायला मिळेल का असा प्रश्न करत होता. त्यांना जेवणासाठी बिर्याणी देण्यात आली, पण त्याचेही हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. दोन महिन्यांपासून अक्षरश: प्रत्येक दिवस आम्ही मोजत होतो, पण आमच्या आनंदावर विरजण पडल्याचे पुजारी म्हणाले.
श्रीदेवी पुजारी यांना या प्रकाराने खूप मानसिक धक्का बसला आहे. त्या कॉमेडी नाइट विथ कपिलमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि यू टय़ूबवर ते उपलब्ध आहे. अनेक टीव्ही शोमध्येही त्यांनी पारितोषिके जिंकली आहेत. मला पारपत्र दिले तेव्हाच का चौकशी केली नाही, असा सवाल त्यांनी केला. मुंबई पोलिसांकडून पुजारी यांनी नुकसानभरपाई मागितली आहे. आता सुट्टय़ाही संपत आल्या आहेत. त्यामुळे दुबईला पुन्हा जाण्याचे जवळपास अनिश्चित झाल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा