खासगीरीत्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाचा बोजा वाढत असल्याची जोरदार तक्रार मुंबईतील शिक्षक करीत आहेत. त्यातून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी आणि त्याच्या प्रवास खर्चापोटी राज्य शिक्षण मंडळाकडून मिळणारे मानधनही तुटपुंजे असल्याने परीक्षक आणि मॉडरेटर यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
या वर्षी मुळातच दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीकरिता परीक्षकांकडे पाच ते सहा दिवस उशिराने येत आहेत. आधी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परीक्षा संपल्यानंतर दोन दिवसांनी परीक्षकांच्या हाती पडत. त्यातून आधी भाषेकरिता प्रत्येक परीक्षकाला २०० उत्तरपत्रिका दिल्या जायच्या. त्याऐवजी २५० दिल्या जात आहेत. गणित आणि विज्ञानाच्याही आधी २५० च्या दरम्यान उत्तरपत्रिका प्रत्येक शिक्षकाला दिल्या जायच्या. त्याचीही संख्या वाढून ३२५ ते ४०० पर्यंत गेली आहे. या वाढत्या कामामुळे दहावीचे परीक्षक कमालीचे नाराज आहेत.
खासगी विद्यार्थी आणि बदललेला अभ्यासक्रम यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. परंतु त्या तुलनेत परीक्षकांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे उत्तरपत्रिकांची संख्या वाढत असल्याचे स्पष्टीकरण विभागीय मंडळाचे सचिव सि. य. चांदेकर यांनी दिले. मुंबईत खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यातील इतर कुठल्याही विभागीय मंडळापेक्षा जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तर त्यात २५ ते २७ हजार अशी वाढ झाली आहे. त्या तुलनेत मुंबईतील शिक्षकांची संख्या वाढलेली नाही. परिणामी सध्या असलेल्या शिक्षकांवरील उत्तरपत्रिका तपासणीचा कामाचा बोजा वाढला आहे.
उत्तरपत्रिकांची संख्या वाढल्याने तपासणी करणाऱ्या शिक्षकांवर कामाचा प्रचंड बोजा येतो. कारण मंडळाच्या नियमानुसार त्यांना एका दिवसात किमान २५ उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. त्यातून शिक्षकांना शाळेचीही कामे असतात.
आता तर शिष्यवृत्ती परीक्षाही दहावीच्या परीक्षेच्या काळात आल्याने शिक्षकांना या परीक्षेच्या आयोजनाचेही काम करायचे आहे, असा तक्रारीचा पाढा शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंडय़ा यांनी वाचला. यंदा तर मालाड-जोगेश्वरी भागातील शाळा शिक्षकांना घाटकोपर, वडाळा या ठिकाणी मॉडरेटर्सकडे उत्तरपत्रिका तपासून पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण त्यासाठी दिला जाणारा प्रवास भत्ताही तुटपुंजा आहे, अशी तक्रार जोगेश्वरी भागातील एका शिक्षकाने केली.
खरे तर २००८ मध्येच विविध शिक्षक संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन व प्रवास भत्ता वाढविण्याची मागणी केली होती. किमान बारावीच्या शिक्षकांना जितके मानधन दिले जाते तितके आम्हाला द्यावे, असे हे शिक्षक सांगत आहेत; परंतु तीही मागणी अद्याप प्रलंबित आहे. याच प्रकारच्या तक्रारी मॉडरेटर्सच्याही आहेत. कारण परीक्षकांवरील भार वाढल्याने त्यांच्यावरचाही कामाचा ताण वाढला आहे.
दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका
तपासणीसाठी मिळणारा मोबदला
उत्तरपत्रिकेचे     दहावीचे     बारावीचे
स्वरूप        मानधन    मानधन
तीन तासांची    ४.२५    ५
अडीच तासांची    ३.५०    ३.७५
दोन तासांची    २.३०    ३
दीड तासांची    २.३०    २.३०
एक तास        १.७५    २
(मानधन रुपये-पैसे)