बोगस शिक्षक दाखवून सरकारकडून लाखो रुपये उकळणाऱ्या मुख्याध्यापकांमुळे चर्चेत आलेल्या कांदिवलीतील डहाणूकर वाडी येथील ‘बालक विहार विद्यालय’ या मराठी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची सध्या चांगलीच परवड सुरू आहे. विद्यार्थ्यांचे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र शाळेत येऊन पडले आहेत. पण त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी नसल्याने त्याचे वाटप अद्याप झालेले नाही.
इतकेच नव्हे तर मुख्याध्यापक नसल्याने शिक्षकांना दोन महिने वेतनच मिळालेले नाही. कारण वेतनाची देयके मुख्याध्यापकांना काढावी लागतात. परंतु मुख्याध्यापकच नसल्याने शाळेची अनेक महत्त्वाची कामे अडून पडली आहेत. राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या मूल्यांकनाच्या कामासाठी शाळेतील शिक्षकांची यादी पाठविली होती. त्यालाही अद्याप शाळेने मान्यता दिलेली नाही. तीन बोगस शिक्षक दाखवून या शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कदम यांनी तब्बल १६ लाख रुपयांची रक्कम वेतन आणि थकबाकीच्या नावाखाली सरकारकडून लाटली होती. तसेच शाळेत शिक्षक म्हणून सेवेतही नसलेल्या व्यक्तीला ‘अतिरिक्त’ म्हणून समायोजनाच्या नावाखाली अन्य शाळेत शिक्षकाची आयती नोकरी मिळवून देण्याचा अफलातून प्रकारही शाळेने केला आहे. मुख्याध्यापकांनी केलेला घोटाळा २२ डिसेंबर २०१४ रोजी ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर या शाळेची पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक राजेश कंकाळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी सुरू केली. तसेच २३ डिसेंबरलाच शिक्षण निरीक्षक कार्यालयाने संस्थेला पत्र लिहून या सर्व घोटाळ्याला जबाबदार असलेले शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कदम यांना पदावरून दूर करून त्यांच्या जागी तत्काळ नवीन मुख्याध्यापक नेमून त्यासंबंधातील प्रस्ताव कार्यालयाला पाठविण्याची सूचना केली होती.
त्यानंतर मुख्याध्यापक कदम रजेवर गेले. खरे तर संस्थेनेच त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या जागी अन्य शिक्षकांपैकी एकाची मुख्याध्यापक म्हणून तात्पुतरी नियुक्ती करणे आवश्यक होते; परंतु संस्थाचालकांनी आजतागायत हे पद भरलेले नाही. मुख्याध्यापकांचे पद रिक्त असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मात्र मोठी परवड सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका शाळेतील दहावीच्या ८२ विद्यार्थ्यांना बसतो आहे.
आणखी तिघे मोकाटच
बोगस शिक्षकांच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी पश्चिम विभागाच्या शिक्षण निरीक्षकांवर कारवाई झाली असली तरी हा सर्व प्रकार ज्या कांदिवलीच्या बालक विहार विद्यालयातील मुख्याध्यापकाने केला तो अद्याप मोकळाच आहे. या प्रकरणी तत्कालीन प्रभारी शिक्षण निरीक्षक प्रकाश बागुल यांना निलंबित करण्यात आले आहे. पण प्रकाश बागुल यांच्याबरोबरच शिक्षण विभागातील सुधीर पवार आणि मुकणे या आणखी दोघा अधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशी समितीने दोषी ठरविले होते. त्यांच्यावरही अद्याप काहीच कारवाई झालेली नाही.