ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी, सांगोला, पंढरपूर भागात शेतकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पंढरपूरजवळ एसटी बस पेटविण्यात आली. यात सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने बंद केलेली एसटी वाहतूक गुरुवारी सकाळी ११.३० नंतर पूर्ववत सुरू केली. तथापि, काही संवेदनशील गावांकडे जाणाऱ्या एसटी बसेसची वाहतूक अन्य पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्याचे एसटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
काल बुधवारी रात्री अकराच्या सुमारास मोहोळ-पंढरपूर मार्गावर तुंगत येथे सोलापूर-कराड (एमएच २० डी ९३२५) ही एसटी बस २० ते २५ अज्ञात शेतकरी कार्यकर्त्यांनी रोखली आणि आग लावून सदर बस जाळली. यात सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील प्रवाशांच्या जीविताला धोका झाला नाही. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील पानगाव व सांगोला तालुक्यातील महूद येथे शेतकरी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. महूद येथे गावबंद करण्यात आले असता त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.
ऊसदराच्या प्रश्नावर जिल्ह्य़ात व आसपासच्या भागात सुरू झालेल्या आंदोलनात एसटी बसेसना लक्ष्य बनविले जात असल्यामुळे एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु वातावरण निवळल्यामुळे एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र खबरदारी म्हणून संवेदनशील भागातून एसटी वाहतूक न करता ती अन्य पर्यायी मार्गावरून वळविण्यात येत आहे. कराड व सातारा भागाकडे जाणाऱ्या गाडय़ा मोहोळ व पंढरपूरमार्गे न सोडता तिऱ्हे, मंगळवेढामार्ग सोडल्या जात आहेत. तर अकलूजकडे जाणाऱ्या गाडय़ा सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथून सोडण्यात येत असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाडय़ा सुरळीतपणे धावत आहेत.
पंढरपूरजवळ एसटी बस जाळली तरीही एसटी वाहतूक सुरू
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी, सांगोला, पंढरपूर भागात शेतकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पंढरपूरजवळ एसटी बस पेटविण्यात आली. यात सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने बंद केलेली एसटी वाहतूक गुरुवारी सकाळी ११.३० नंतर पूर्ववत सुरू केली.
First published on: 16-11-2012 at 02:19 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus burnout but no effect on st bus reguler transport in pandharpur